यंदा पूर्वमॉन्सून पेरणीला लगाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

अमरावती : यावर्षी कपाशीची बियाणे 20 मे नंतरच बाजारात येतील. बियाणे विलंबाने बाजारात आल्याने पूर्वमॉन्सून पेरणी होणार नाही. कपाशीवरील रोगकिडीच्या संकटाने हादरलेल्या यंत्रणेने गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

अमरावती : यावर्षी कपाशीची बियाणे 20 मे नंतरच बाजारात येतील. बियाणे विलंबाने बाजारात आल्याने पूर्वमॉन्सून पेरणी होणार नाही. कपाशीवरील रोगकिडीच्या संकटाने हादरलेल्या यंत्रणेने गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
अमरावती विभागात गतवर्षी (2017-18) सरासरी 10 लाख 87 हजारपैकी 9 लाख 96 हजार 17 हेक्‍टरमध्ये (92 टक्के) कपाशीची पेरणी झाली होती. त्यात कपाशीच्या पूर्वमॉन्सून पेरणीचे क्षेत्र जिल्हानिहाय बुलडाणा 1265, अकोला 860, अमरावती 354 असे एकूण 2 हजार 479 हेक्‍टर होते. त्यापूर्वीच्या वर्षी, म्हणजे 2016-17 मध्ये पूर्वमॉन्सून कपाशीचे पेरणीक्षेत्र बुलडाणा 3632, अकोला 1207, वाशीम 120, अमरावती 237 व यवतमाळ 2480, असे एकूण 7 हजार 676 हेक्‍टर होते.
सन 2000 पासून बीटी कपाशीची लागवड केली जात आहे. बीटी बियाण्यांसोबतचे रिफ्यूजी बियाणे न लावल्याने बोंडअळीचा जीन सशक्त होऊन त्याने गतवर्षी राज्याच्या तिजोरीला पोखरून टाकले. एकट्या अमरावती जिल्ह्यात बोंडअळीच्या मदतीपोटी शासनातर्फे शेतकऱ्यांना 182 कोटी रुपये द्यावयाचे आहेत. अमरावती विभागात ही रक्कम 600 कोटींच्या घरात आहे.
कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग व बियाणे कंपन्यांनी यावर्षी जानेवारीत जनजागृती केली. डिसेंबरमध्ये कपाशीची वेचणी पूर्ण करावी. खोडवा व फरदड घेऊ नये. जानेवारीपासून शेत खोल नांगरणी करून खुले ठेवावे, जेणेकरून बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्टात येईल, असा त्यामागील हेतू होता; परंतु काही भागांत काही शेतकऱ्यांनी पंधरवड्यापूर्वी कपाशीची वेचणी केली.
दरम्यान, कृषी आयुक्तालयाने यंदा कपाशीचे बियाणे 20 मेपूर्वी बाजारात न आणण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. यामुळे कपाशीची पूर्वमॉन्सून पेरणी होणार नाही आणि बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होईल, असा विश्‍वास कृषी विभागाला आहे. पूर्वमॉन्सून पेरणीसाठी काही भागांत मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच रोप तयार केले जाते, तर काही भागात 15 मेपासून धूळपेरणीला सुरुवात होते. 60 दिवसांत पीक पाती व बोंडावर येते. त्यामुळे बोंडअळीचे जीवनचक्र कायम राहते.

Web Title: pre monsoon cotton sowing affected