मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुसळधार पाऊस

अहेरी : पावसामुळे साचलेल्या पाण्यातून मतदानासाठी जाताना महिला.
अहेरी : पावसामुळे साचलेल्या पाण्यातून मतदानासाठी जाताना महिला.

अहेरी (जि. गडचिरोली) : अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्‍यांत रविवारी (ता. 20) मध्यरात्री मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे दुर्गम भागातील मतदारांना जीव मुठित घेऊन मतदानासाठी पुढाकार घ्यावा लागला. सोमवारी निवडणुकीसाठी मतदारांना साचलेल्या पाण्यातून जावे लागले. त्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मतदारांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीचा आपला हक्क बजावला.
अहेरी विधानसभा मतदारसंघात अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा आणि भामरागड या पाच तालुक्‍यांचा समावेश आहे. या विधानसभा क्षेत्रात 2 लाख 36 हजार 286 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मागील तीन दिवसांपासून या विधानसभा क्षेत्रातील विविध तालुक्‍यांत पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. भरपावसातच निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदानाची तयारी करावी लागली. सोमवारी सकाळपासूनच मुख्य शहरातील लोकांनी घराबाहेर पडून मतदान करायला सुरुवात केली. मात्र, दुर्गम भागातील मतदारांना याचा खूप मोठा फटका बसला आहे. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात मुख्य रस्ते आणि नदीवर पूल नसल्याने तुडुंब भरलेल्या नदी-नाल्यातून जीव मुठीत घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर त्यांना यावे लागले.
भामरागड तालुक्‍यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या लाहेरी येथील मतदान केंद्रावर अतिदुर्गम भागातील मतदारांनी एकच गर्दी केली होती. बिनागुंडा, होड्री, लष्कर, फोदेवाडा, गुंडेनूर, लाहेरी, पेरमलभट्टी आदी गावांचा या मतदान केंद्रात समावेश होता. रविवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने कहर केल्याने येथील नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. मात्र या भागातील मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. पाऊस वाट तुडवत अनेक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

आवाहनाला प्रतिसाद
भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांनी अतिदुर्गम भागातील लोकांची भेट घेऊन जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले होते आणि योग्य पद्धतीने जनजागृती कार्यक्रम हाती घेतल्याने लोकांनीसुद्धा अनेक अडचणींचा सामना करून मतदान केले. अनेक मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून आले. एकंदरीत मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मुसळधार पावसामुळे नदी-नाले भरून असतानासुद्धा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील मतदार मतदान केंद्रावर हजर झाले. अत्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान शांततेत पार पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com