सोयी-सुविधांअभावी गर्भवतीला खाटेवरच नेले रुग्णालयात, पण डॉक्‍टर म्हणाले...

Pregnant woman hospitalised on cot
Pregnant woman hospitalised on cot

भामरागड (जि. गडचिरोली) : विदर्भातील दुर्गम भाग असा शिक्‍का कायम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा किती तोकड्या आहेत, याची प्रचिती वारंवार येते. साध्या साध्या उपचारांअभावी रुग्णाला आपला जीव गमावावा लागतो. जिल्ह्याच्या दुर्गम भागात स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही दळणवळणाची साधन नसल्याने नागरिकांना उपचारासाठी पायपीट करून किंवा खाटेवर उचलून न्यावे लागते. नदी, नाल्याच्या पुरामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने आजवर अनेक रुग्ण दगावले आहेत. असाच प्रकार भामरागड तालुका मुख्यालयात घडला.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भामरागड तालुक्‍यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत सोमवारी गुंडेनूर गावातील जया पोदाडी नामक महिला शेतात काम करून घरी परतल्यावर अचानक तिला चक्कर आला. नातेवाइकांनी तिला खाटेवर टाकून गावालगतच्या नाल्यातून वाट काढून सहा किलोमीटर अंतरावरील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर झाल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले.

जया रवी पोदाडी (23) असे मृत महिलेचे नाव असून, ती चार महिन्यांची गरोदर होती. उपचाराअभावी चार महिन्यांच्या गरोदर मातेला आपला जीव गमवावा लागला. भामरागड अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग असून, या परिसरात अजूनही पक्‍के रस्ते आणि नदी-नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या नदीच्या प्रवाहातून जीव धोक्‍यात घालून औषधोपचार तसेच अत्यावश्‍यक कामासाठी जावे लागते. लाहेरीहून रुग्णवाहिकेने तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. ती चार महिन्यांची गरोदर होती. तिला चार वर्षांचा एक मुलगा आहे. तिचा मृत्यू नेमकं कशामुळे झाले हे स्पष्ट झाले नाही.

मूलभूत सुविधांची वानवा

एका गरोदर मातेने बाळंतपणासाठी 23 किलोमीटर पायपीट केल्याची घटना ताजी असतानाच वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना भामरागड तालुक्‍यातील गुंडेनूर येथे घडली. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. आरोग्याच्या साध्या साध्या सुविधा मिळत नसल्याने लहान मुले, माता यांना जीव गमवावा लागतो. नक्षलगस्त भाग अशी ओळख असलेल्या या परिसराचा विकास होणार तरी कधी, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

अहवालानंतर कळेल सत्य

जया पोदाडी या महिलेला भामरागड येथील रुग्णालयात पाठवीत असल्याचा मॅसेज लाहेरी येथील डॉ. भोकरे यांनी पाठविला होता. त्यानंतर ती सव्वा सात वाजता रुग्णालयात पोहोचली. आम्ही तिला तपासले असता ती मृत झाल्याचे आढळून आले. तिच्या हृदयात रक्त गोठल्याचे आढळून आले. त्यामुळे व्हॉल्वचा प्रॉब्लेम असावा. मात्र, जयाच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कळेल.
डॉ. भावेश वानखेडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, भामरागड

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com