धावत्या रेल्वेत दोघींना प्रसूतिवेदना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

दाणापूरची रहिवासी संजुराम यादव (२७) पती प्रकाशसह बंगळुरात काम करते. डॉक्‍टरांनी २ मे प्रसूतीची तारीख दिली होती. त्यानुसार, प्रसूतीसाठी ती आजगढ येथील माहेरी जात होती. बंगळूर-दाणापूर संघमित्रा एक्‍स्प्रेसच्या एस-९ बोगीतून तिचा प्रवास सुरू होता. सोबत कुणीही नव्हते. गाडी नागपूरकडे येत असताना अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या.

नागपूर - वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या दोघींना अचानक प्रसूतिवेदना सुरू झाल्या. दोघींनाही नागपूर स्थानकावर उतरवून घेतल्यानंतर आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले.  

दाणापूरची रहिवासी संजुराम यादव (२७) पती प्रकाशसह बंगळुरात काम करते. डॉक्‍टरांनी २ मे प्रसूतीची तारीख दिली होती. त्यानुसार, प्रसूतीसाठी ती आजगढ येथील माहेरी जात होती. बंगळूर-दाणापूर संघमित्रा एक्‍स्प्रेसच्या एस-९ बोगीतून तिचा प्रवास सुरू होता. सोबत कुणीही नव्हते. गाडी नागपूरकडे येत असताना अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एकाने रेल्वे नियंत्रण कक्षाला फोनद्वारे माहिती दिली. गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येण्यापूर्वीच आरपीएफच्या सुषमा ढोमणे, संगीता कांबळे आणि एएसआय पी. एस. बघेल फलाट क्रमांक १ वर उपस्थित झाले. सकाळी ९.१० वाजता गाडी येताच संजुरामला मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. 

दुसरी घटना पुरी-अहमदाबाद एक्‍स्प्रेसमध्ये घडली. बडोदा येथील रहिवासी सोनालिका नीलेश (३२) ही पुरीहून बडोद्यासाठी बी-२ बोगीतील ४० क्रमांकाच्या बर्थहून प्रवास करीत होती. केवळ ७ वर्षांची मुलगी सोबत होती. प्रवासादरम्यान असह्य वेदना सुरू झाल्या. बोगीतील महिला प्रवाशांनी धीर देत रेल्वे कंट्रोल रूमला माहिती दिली. 

गाडी येण्यापूर्वी रेल्वे डॉक्‍टर मंगेश चौधरी, उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव फलाट क्रमांक ८ वर उपस्थित झाले. दुपारी ४.४० वाजता गाडी पोहोचताच तपासणी करून तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, श्रीवास्तव यांनी सोनालिका यांच्या पतीचा मोबाईल नंबर शोधून घटनेची माहिती दिली.

Web Title: Pregnant Women Maternity pains Railway