अपहरण करून गर्भवतीवर सामूहिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

अमरावती : गर्भवती महिलेचे अपहरण केल्यानंतर बडनेरा परिसरात तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 28) घडली. फ्रेजरपुरा ठाण्यात या प्रकरणी भातकुली पंचायत समितीच्या अधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अमरावती : गर्भवती महिलेचे अपहरण केल्यानंतर बडनेरा परिसरात तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 28) घडली. फ्रेजरपुरा ठाण्यात या प्रकरणी भातकुली पंचायत समितीच्या अधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन परसराम गुल्हाने व सय्यद राशिद या दोघांवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. गुल्हाने हे भातकुली पंचायत समितीत पोषण आहार अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या कटात सहभागी म्हणून गुल्हाने यांच्या अधिकारी पत्नीसह अन्य एका महिलेचाही समावेश असल्याचा आरोप पीडित महिलेने केला. पोलिसांनी दोन महिलांना या कटात सहआरोपी केले आहे. पीडित महिला (वय 24) ऑटोची वाट बघत फ्रेजरपुरा परिसरातील त्रिकोणी बगीचाजवळ उभी होती. त्या वेळी अचानक एका वाहनातून आलेल्या तिघांनी तिला बळजबरीने वाहनात बसविले. त्या वेळी गुल्हाने व सय्यद राशिद या दोघांसह अन्य दोन महिलाही त्यात होत्या. त्यापैकी एकाने पीडितेला चाकूचा धाक दाखवून बडनेरा परिसरात नेले. गर्भवती असताना दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. शिवाय तिला मारहाणही करण्यात आली, असेही पीडितेने तक्रारीत नमूद केले. अपहरण व मारहाणीच्या कटात गुल्हाने यांची पत्नी व अन्य एक महिला सहभागी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बडनेरा परिसरात अत्याचार केल्यानंतर पीडितेला तेथेच सोडून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिसरातील काही नागरिक व पोलिसांच्या मदतीने पीडितेने फ्रेजरपुरा ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरण व सामूहिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केला, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले.

Web Title: pregnent women raped in badnera