प्रीती बारिया खून खटल्यातील आरोपींना जन्मठेप

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिलेल्या आदेशामध्ये जन्मठेपेमध्ये रूपांतरित केली. घटनेच्या दिवशी वातानुकूलित यंत्रणा (एसी) दुरुस्त करण्याच्या बहाण्याने आरोपींनी घरात प्रवेश केला होता. दोनही आरोपींवरील आरोप सिद्ध झाल्यानंतर 30 जून 2018 रोजी भंडारा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर, आरोपींनी अपील दाखल करून सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावर, आज न्यायमूर्ती प्रदीप देशमुख व न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या समक्ष सुनावणी झाली. एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करणे, संधी पाहून घरातील व्यक्तींचा खून करणे व त्यानंतर घरातील मुद्देमाल चोरून नेणे ही आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत होती. ही घटना 30 जुलै 2015 रोजी घडली होती. तकिया वॉर्डमध्ये बारिया यांचे घर आहे. आरोपींनी रात्री एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर, संधी पाहून प्रीती बारिया (30) यांना डोक्‍यावर हातोडीने वार करून ठार मारले.
दरम्यान, बारिया यांचा मुलगा भव्य (9) त्या ठिकाणी आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्‍यावर हातोडीने वार केले. त्यामुळे, भव्यला कायमचे अपंगत्व आले. त्यापूर्वी, आरोपींनी दुपारी म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरीदेखील एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला होता व त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्‍यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीलाही कायमचे अपंगत्व आले. सरकारतर्फे ऍड. नीरज जावडे, आरोपींतर्फे ऍड. ओमप्रकाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com