विकास ठाकरेंना रोखण्यासाठी स्वपक्षीयांकडूनच उचापती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

वनवेंचा गटनेतेपदावर दावा - 17 नगरसेवकांच्या समर्थनाचा दावा

वनवेंचा गटनेतेपदावर दावा - 17 नगरसेवकांच्या समर्थनाचा दावा
नागपूर - कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना महापालिकेत येण्यापासून रोखण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष तानाजी वनवे यांनी कंबर कसली आहे. वनवे यांनी 17 नगरसेवकांचे समर्थन असल्याचा दावा करीत महाकाळकर यांना गटनेतेपदावरून काढण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली. त्याचवेळी त्यांनी नामनिर्देशित सदस्य निवडीची प्रक्रियाही थांबविण्याची मागणी केल्याने ठाकरेंना रोखण्यासाठीच या उचापती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांना विरोधी पक्षनेते केल्यापासून महापालिकेत कॉंग्रेस दोन गटात विभागली असून, एकमेकांवर कुरघोडीची कुठलीही संधी सोडत नाही. मंगळवारी सकाळी विकास ठाकरे यांच्या विरोधीगटाने छत्रपतीनगर चौकातील प्रगती सभागृहात वेगळी बैठक घेऊन तानाजी वनवे यांची पक्षनेतेपदी निवड केली.

पक्षनेतेपदी निवडीमुळे स्फूरण चढलेले तानाजी वनवे यांनी लगेच बैठकीत उपस्थित असलेले माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. वनवे यांनी विभागीय आयुक्तांना 17 नगरसेवकांची स्वाक्षरी असलेले समर्थनपत्र देत संजय महाकाळकर यांचे समर्थन करणाऱ्या नगरसेवकांची संख्या कमी असल्याकडे लक्ष वेधले. 17 नगरसेवकांच्या समर्थनामुळे गटनेतेपदावरही त्यांनी दावा केला.

गटनेतेपदाचा वाद निकाली निघेपर्यंत स्वीकृत सदस्याची प्रक्रिया रोखण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे कॉंग्रेसमधील दुही कमी होण्याची भविष्यात कुठलीही चिन्हे दिसून येत नाही. तानाजी वनवे यांनी विभागीय आयुक्तांकडे काही नगरसेवक उपस्थित होते, असे सांगितले. मात्र, सतरा नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. वनवे यांनी प्रफुल्ल गुडधे पाटील, संदीप सहारे, जुल्फीकार अहमद भुट्टो, पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, रमेश पुणेकर, कमलेश चौधरी, नेहा निकोसे, परसराम मानवटकर, हर्षला साबळे, प्रणिता शहाणे, मनोज गावंडे, आशा उईके, अन्सारी सय्यद बेगम मोहम्मद निजामुद्दीन, गार्गी चोप्रा, दिनेश यादव यांचे समर्थन असल्याचा दावा केला. यात विकास ठाकरे यांच्या समर्थकांचीही नावे आहेत.

Web Title: To prevent Vikas Thackeray from the opposition parties