बलात्काराचा आरोप असलेला कैदी भुर्र...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नागपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीने अजनी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून पळ काढल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. निखिल चैतराम नंदनकर (27, भांडेवाडी रेल्वेस्थानकाजवळ) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री उद्या शहरात येत असताना ही घटना घडल्याने पोलिस चांगलेच हादरले आहेत.

नागपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीने अजनी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून पळ काढल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. निखिल चैतराम नंदनकर (27, भांडेवाडी रेल्वेस्थानकाजवळ) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री उद्या शहरात येत असताना ही घटना घडल्याने पोलिस चांगलेच हादरले आहेत.
आरोपीवर एका अल्पवयीन मुलीचे अपहरण तसेच बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. संबंधित मुलगी सतरा वर्षांची असून इव्हेंटचे काम करायची. दोन जूनला मैत्रिणीकडून कामाचे पैसे घेऊन येते असे सांगून ती घरून निघाली. त्यानंतर ती घरी आलीच नाही. 15 दिवस तिच्या आईने तिचा शोध घेतला; परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे 16 जून रोजी मुलीच्या आईने अजनी पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी 363 अन्वये गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास पाचपावलीचे प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक बोंडे यांच्याकडे दिला होता. उपनिरीक्षक बोंडे यांनी तपास केला असता आरोपी निखिल नंदनकरने तिला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. मात्र, निखिल पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलिस त्याच्या मागावरच होते. पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता निखिलने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. त्यावरून 376 आणि पोक्‍सोअन्वये कलम वाढविण्यात आले.
सापळा रचून केली अटक
बुधवारी दुपारी निखिल आपल्या घरी आला होता. ही माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी भांडेवाडी येथील त्याच्या घराच्या आजूबाजूला सापळा रचला. अचानक छापा घालून निखिलला ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला सायंकाळी 6.30 च्या सुमारास अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक करून लॉकअपमध्ये डांबले.
लॉकअपचे दार उघडेच !
लॉकअप गार्ड ड्यूटीला महिला शिपाई वनिता जुनघरे होती. लॉकअपमध्ये आरोपीला डांबल्यानंतर दार बंद केले नाही. आरोपी लॉकअपमध्ये केवळ कोंडल्या गेला होता. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. लॉकअपचे दार केवळ लोटले असल्याचे आरोपीच्या लक्षात आले. तसेच पोलिस कर्मचारी वनीता ही कुठेतरी निघून गेली. या संधीचा फायदा घेत निखिलने दार उघडून पोलिस ठाण्याच्या मागील दाराने पळ काढला.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास वनीता लॉकअपजवळ आली असता तिला आरोपी निखिल दिसून आला नाही. लॉकअपमधून आरोपी पळून गेल्याचे समजताच पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्याला पकडण्यासाठी पोलिस पथके पाठविण्यात आली. मात्र, निखिल पोलिसांना मिळून आला नाही. सुरूवातीला आरोपी कुठेतरी मिळेल म्हणून अजनी पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी बोभाटा झाल्यामुळे प्रकरण चव्हाट्यावर आले. त्यामुळे पोलिस उपायुक्‍तांना माहिती देण्यास भाग पडले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoner accused of rape