पोलिसांच्या ताब्यातून कैदी फरार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नागपूर - कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी पोलिसांना गुंगारा देऊन रेल्वेतून उडी मारून फरार झाला. ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास बोदवड रेल्वे स्टेशनजवळ घडली. सतीश ऊर्फ छोट्या जैनू काळे (वय ३५) असे पोलिसांना चकमा देऊन पळून जाणाऱ्या कैद्याचे नाव आहे. 

नागपूर - कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी पोलिसांना गुंगारा देऊन रेल्वेतून उडी मारून फरार झाला. ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास बोदवड रेल्वे स्टेशनजवळ घडली. सतीश ऊर्फ छोट्या जैनू काळे (वय ३५) असे पोलिसांना चकमा देऊन पळून जाणाऱ्या कैद्याचे नाव आहे. 

सतीश काळे (रा. बिलौनी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) हा कुख्यात दरोडेखोर असून त्याने  टोळी बनवून अनेक ठिकाणी गुन्हे केले आहेत. दरोडा टाकताना शस्त्रासह हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न लूटमार करण्यात तो पटाईत आहे. त्याला एका सशस्त्र दरोडा आणि प्राणघातक हल्ला  केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. २०१७ मध्ये त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पाठविण्यात आले होते. नाशिकमधील निफाड न्यायालयात सुरू असलेल्या दुसऱ्या केसच्या सुनावणीकरिता त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक पोलिस हवालदार ईश्‍वर गुडधे, पोलिस शिपाई केशव दिघोरे आणि सतीश गवई हे २६ नोव्हेंबर रोजी सेवाग्राम एक्‍स्प्रेसच्या तीन नंबरच्या डब्यातून घेऊन जात होते. २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्टेशनवर पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. त्याचा शोध घेण्यात येत असून तो अद्याप मिळाला नाही. या प्रकरणाची माहिती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला देण्यात आली असून कैदी सतीश काळेच्या शोधासाठी नागपूर आणि जळगाव पोलिसांनी पथके तयार केली आहे. बोदवडच्या आसपासच्या परिसरात पोलिसांनी कैद्याचे फोटो दाखवून शोध सुरू केला आहे.

असा दिला गुंगारा
बोदवड रेल्वे स्टेशनजवळ येताच कैदी सतीश काळेने लघुशंकेला जायचे असल्याचे सांगितले. तीन वाजता झोपेतच असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याची हातकडी उघडली आणि जाऊन येण्यास सांगितले. पोलिस झोपलेले असल्याची आयती संधी साधून त्याने हळू जात असलेल्या रेल्वेतून उडी घेतली आणि फरार झाला. तासाभरानंतर एका शिपायाचे डोळे उघडल्यानंतर कैदी दिसत नसल्याचे लक्षात आल्याने सर्वांची झोप उडाली. 

कारागृह फोडून पळाले होते कैदी
नागपूर कारागृह फोडून ३१ मार्च २०१५ मध्ये ५ कैदी पळून गेले होते. त्यानंतर मेडिकल हॉस्पिटल येथून उत्तर प्रदेशातील ३ आरोपींनी नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. तर जून २०१५ मध्ये एक कैदी एका मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर तो जेलच्या शेतात काम करीत  असताना पळून गेला. त्यापूर्वी नागपूर महाल बडकस चौक येथे पेरलेल्या शक्तिशाली पाइप बाँब प्रकरणातील सिमीचा आरोपी जळगाव येथून पेशीवरून परत येताना नागपूर पोलिसांच्या तावडीतून पळाला होता. तर दोन वर्षांपूर्वी तुरुंगातील आरोपींची ने-आण करताना अमली पदार्थ व अवास्तव सुविधा पुरविल्याच्या आरोपावरून आठ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, हे विशेष.

Web Title: Prisoner escaped from police custody