एवढ्या वाघांना जिवंत जेरबंद केले, मग 'अवनी'नेच काय बिघडवले होते... 

A Private hunters was called to kill Avni tiger
A Private hunters was called to kill Avni tiger

नागपूर : राज्यातील वनाधिकाऱ्यांनी मानवावर हल्ला करणाऱ्या तीन वाघांना दोन महिन्यांत जेरबंद करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. मात्र, दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील वाघीण अवनीला (टी-1) ठार मारण्यासाठी चक्क व्यावसायिक शिकाऱ्याला बोलावून सर्वांनाच चकित केले होते. त्यावेळी वनाधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर विश्‍वास दाखविला असता, तर अवनी वाचली असती, असा सूर वन्यजीवप्रेमींमध्ये उमटू लागला आहे. 

वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही आणि आताही वाघासह वन्यप्राण्यांना अत्याधुनिक यंत्रणा, प्रशिक्षित कर्मचारी व अधिकाऱ्याची कमी असताना यशस्वीरीत्या जेरबंद अथवा ठार केले आहे. आता अत्याधुनिक यंत्रणासह पशुवैद्यकीय चिकित्सकांची मोठी फळी असताना अवनीला ठार मारण्यासाठी खासगी व्यक्तीला पाचारण करण्यात आले होते. त्या खासगी शिकाऱ्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना मनस्तापही सहन करावा लागला. यासंबंधी तक्रारीही वनसचिवांसह प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे करण्यात आल्या होत्या. तरीही खासगी शिकाऱ्याला त्या मोहिमेतून दूर न करता त्याला अभय देण्यात येत होते. 

अवनीच्या मृत्यूला दीड वर्ष झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या पाच ते सहा महिन्यांत मनुष्यावर हल्ला करणाऱ्या सात वाघांना यशस्वीरीत्या जेरबंद करून काहींना जंगलातही मुक्त केलेले आहे. त्यामुळे तेव्हा वनाधिकारी प्रशिक्षित नव्हते का, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. अवनी वाघिणीला ठार मारण्यासाठी आणलेल्या शफाअत अली खान व मुलगा असगर अली खान यांनी पावलोपावली नियमांचे उल्लंघन केल्याचे एनटीसीएने तयार केलेल्या समितीने ठपका ठेवला होता. 

समितीने राज्य सरकारकडे सोपविलेल्या अहवालात वनकायदा, शस्त्रकायदा आदीचे उल्लंघन करण्यात आल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. 
अवनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश देताना तत्कालीन सरकारने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत शिबिर कार्यालय सोडू नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काम करताना दडपण येत होते. परिणामी, अवनी वाघिणीला जेरबंद करण्यास अपयश येत असल्याचे या सात वाघांना यशस्वीरीत्या जेरबंद केल्यानंतर स्पष्ट झालेले आहे. यामुळे भविष्यात विभागातील कर्मचाऱ्यांवरच विश्‍वास दाखवावा, अशी चर्चा आहे. 

दिलेली ऑर्डर चुकीची नव्हती
अवनी वाघिणीने 13 जणांना ठार केल्यामुळे त्या वाघिणीला ठार व जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. ती दिलेली ऑर्डर चुकीची नव्हती. त्याला न्यायालयातही आव्हान दिले होते. यापूर्वीही असे ऑर्डर दिलेले आहेत. मात्र, माझ्यावर अशी वेळ आलेली नाही, येणार नाही, असेही नाही. 
-नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 

ती नरभक्षक झाली होती 
"त्या' वाघिणीने जंगलात नव्हे, तर गावात किंवा गावाच्या शेजारील नागरिकांवर हल्ला करून ठार मारले होते. ती नरभक्षक झाली होती. तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार अवनीला मारण्यासाठी खासगी शिकाऱ्याला बोलाविण्यात आले होते. 2012-13 मध्येही खासगी व्यक्तीकडून वाघाला मारण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. 
-सुधीर मुनगंटीवार, राज्याचे माजी वनमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com