पूनम मॉल पाडण्यासाठी खासगी संस्थेची मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नागपूर : वर्धमाननगरातील जीर्ण घोषित केलेले पूनम मॉल पाडण्यासाठी यंत्रणेचा अभाव असल्याने महापालिका आता कुशल मनुष्यबळासह खासगी संस्थेची मदत घेणार आहे. यासाठी खासगी संस्थेला भाडे देण्याची तयारीही महापालिकेने केली.

नागपूर : वर्धमाननगरातील जीर्ण घोषित केलेले पूनम मॉल पाडण्यासाठी यंत्रणेचा अभाव असल्याने महापालिका आता कुशल मनुष्यबळासह खासगी संस्थेची मदत घेणार आहे. यासाठी खासगी संस्थेला भाडे देण्याची तयारीही महापालिकेने केली.
मागील आठवड्यात पूनम मॉलचे स्लॅब पडल्याने सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. महापालिकेने पूनम मॉलचे सात हजार वर्ग चौरस मीटरमधील बांधकाम शिकस्त घोषित केले. बांधकाम पडण्यासंदर्भात महापालिकेने पूनम मॉल व्यवस्थापनाला नोटीसही तत्काळ बजावली. मात्र, पूनम मॉल व्यवस्थापनाने मॉल पाडण्याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मॉल पाडण्यास सुरुवात केली. मात्र, पूनम मॉल प्रशासनाने महापालिकेच्या कार्यवाहीवर आक्षेप घेतला. महापालिका जीर्ण भाग योग्य पद्धतीने पाडत नसल्याने इतर भागांचे नुकसान होत असल्याचा आरोप पूनम मॉल प्रशासनाने केला होता. त्यामुळे बांधकाम पाडण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आली होती. बांधकाम पाडावे कसे? असा प्रश्‍न महापालिकेपुढे उभा होता. आज मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी लकडगंज झोनचे सहायक आयुक्त व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी बांधकाम पाडण्यासाठी पारंगत खासगी संस्थेकडून तांत्रिक मदत घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुशल मनुष्यबळही मागविण्यात येणार आहे. यासाठी भाडे देण्याचीही तयारी महापालिकेने केली असल्याचे सूत्राने नमूद केले.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private organization assisted in demolishing Poonam Mall