वॉर्डावॉर्डांत खासगी पॅथॉलॉजीचे तंत्रज्ञ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नागपूर : मेडिकलच्या पॅथॉलॉजी विभागात कोट्यवधींची अद्ययावत अशी यंत्रसामग्री आहे. रात्री अपरात्री रक्ताच्या चाचण्याची सोय आहे. मात्र, येथील डॉक्‍टर नातेवाइकांना रक्त चाचण्यांसाठी थेट खासगी पॅथॉलॉजीचा रस्ता दाखवितात. नाहीतर खासगी पॅथॉलॉजीतील तंत्रज्ञांना थेट वॉर्डात बोलावतात. यावरून डॉक्‍टरांचे लागेबांधे खासगी पॅथॉलॉजीस्टशी असल्याचे दिसून येते. गुरुवारी ट्रॉमा युनिटमध्ये एका एजंटला अटक केली. मात्र, कोणताही गुन्हा न नोंदवता त्यांना सोडून देण्यात आले. यावरून या गोरखधंद्याची माहिती पुढे आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रक्तपेढी आहे. 24 तास रक्त तपासणीची सोय आहे. तरीदेखील डॉक्‍टरांच्या मध्यस्थीने वॉर्डात खासगी (प्रायव्हेट) पॅथॉलॉजीमधील "तंत्रज्ञ' येऊन रुग्णाचे रक्त काढतात. तपासणीसाठी बाहेर घेऊन जातात. नंतर वॉर्डात रिपोर्ट आणून देतात. खासगी पॅथॉलॉजीच्या एजंटला खास या परिसरात तैनात केले आहे. असे विदारक चित्र मेडिकलच्या सर्वच वॉर्डांत बघायला मिळते. अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक सात मध्येही काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. वॉर्डात भरती असताना रुग्णांच्या नातेवाइकांना उपचारादरम्यान वेळेत रक्त तपासणीचा अहवाल यावा ही माफक अपेक्षा असते. परंतु, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ही चाचणी होत नाही, असे कारण सांगत रक्त नमुने घेण्यासाठी थेट खासगी पॅथॉलॉजीतील एजंटला बोलवण्यात येते. रक्त काढल्यानंतर अहवालही लगेच काही तासात दिला जातो. मेडिकलच्या आवारात सहा ते सात एजंट डॉक्‍टरांकडून येणाऱ्या फोनच्या प्रतीक्षेत असतात. मेडिकलमधील मेडिसीन विभागाच्या सर्वच वॉर्डासह सर्जरी विभागातील काही वॉर्डांमध्ये हा गोरखधंदा बिनदिक्कतपणे सुरू आहे.
अधिष्ठाता कार्यालय नापास
मेडिकलमधील रुग्णसेवेची घडी सुरळीत चालावी यासाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयावर जबाबदारी आहे. मात्र, सद्यस्थितीत मेडिकलमधील वैद्यकीय अधीक्षक कक्ष रुग्णसेवेतील तक्रारीपेक्षा प्रशासनातील कारभारात अधिक गुंतले आहे. कधी किचन तर कधी धोबीघाट, कारखाना यात गुंतला आहे. वैद्यकीय कक्ष तक्रारींचा निपटारा करण्यात नापास झाला आहे. 2010 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी अशा तक्रारी येताच तत्काळ दखल घेत अशा गोरखधंद्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, सध्याचे वैद्यकीय अधीक्षक कार्यालय दखल घेत नाही, यावरून याच अधीक्षक कार्यालयात पाणी मुरत असल्याची जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात आहे.

गरीब रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त तपासणीसाठी खासगीत पाठवले जाऊ नये. विशेष असे की, खासगी पॅथॉलॉजीच्या तंत्रज्ञानी मेडिकलच्या वॉर्डात प्रवेश नाही. यासंदर्भात विभागप्रमुखांशी चर्चा करण्यात येणार असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private pathology technician at wardworld