प्रो. साईबाबासह पाच जणांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

गडचिरोली - नक्षल्यांना मदत करीत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी अटक केलेले दिल्ली विद्यापीठातील रामलाल आनंद महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक प्रो. जी. एन. साईबाबा यांच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी व पांडू नरोटे यांना आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यातील अन्य एक आरोपी, विजय तिरकी यास 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

प्रो. साईबाबा हा माओवादी चळवळीच्या "थिंक टॅंक'चा प्रमुख मानला जात होता. त्यामुळे न्यायालयाच्या या निकालाने माओवादी चळवळीला जबर धक्का बसला असून देशात अशाप्रकारे प्रमुख माओवादी नेत्याला मोठी शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलिस दलाचे मनोबल उंचावले आहे.

गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्रा यास ऑगस्ट 2013 मध्ये महेश तिरकी व पांडू नरोटे या दोन युवकांसह अहेरी येथे अटक केली होती. हेम मिश्राच्या माहितीवरून पोलिसांनी नंतर सप्टेंबर 2013 मध्ये प्रशांत राही यास अटक केली. हे दोघेही प्रमुख नक्षली नेते गणपती व नर्मदाक्का आणि प्रो. साईबाबा यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करीत असल्याचे त्यांच्या चौकशीत उघड झाले. तेथूनच साईबाबा पोलिसांच्या रडारवर आला होता. त्यानंतर 9 मे 2014 रोजी पोलिसांनी दिल्लीतून प्रो. साईबाबा याला अटक केली. साईबाबा हे 90 टक्‍के अपंग असल्याने त्यांच्या प्रकृतीच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा उपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. या पत्राला रिट याचिका म्हणून दाखल करून घेत न्यायालयाने साईबाबा यांना तीन महिन्यांचा तात्पुरता जामीन दिला. पुढे तो जामीन आणखी वाढविण्यात आला. दरम्यान, हेम मिश्राला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन दिला. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. अरुण चौधरी यांनी साईबाबा यांच्या जामीन देण्यात मुंबई खंडपीठाचा हस्तक्षेप अमान्य करीत 23 डिसेंबर 2015 रोजी साईबाबा यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. या आदेशानंतर साईबाबाने 25 डिसेंबर 2015 रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले व त्यांची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

मात्र, तत्पूर्वीच 27 ऑक्‍टोबर 2015 पासून साईबाबा प्रकरणाची सुनावणी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू करण्यात आली. ही सुनावणी सुरू असताना साईबाबा यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडून माहिती घेतली. या न्यायालयाने 8 महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवायची असल्याचे सांगून त्यांची यादी सर्वोच्च न्यायालयाला सादर केली. त्यानंतर फेब्रुवारी 2016 अखेर सर्वोच्च न्यायालयाने एक महिन्याच्या आत सर्व महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाला दिले. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने 4 मार्च 2016 पासून दररोज सुनावणी सुरू केली. 31 मार्चपर्यंत सर्व आठही साक्षीदारांची साक्ष नोंदविल्याचे कळविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 4 एप्रिल 2016 रोजी साईबाबा यांना जामीन मंजूर केला.

आज मंगळवारी (ता. 7) गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. या प्रकरणातील सर्व साक्षी, पुरावे तपासल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी प्रो. जी. एन. साईबाबा, हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी व पांडू नरोटे यांना देशविघातक कृत्य, बंदी घातलेल्या संघटनांचा सदस्य असणे याबाबत यूएपीए कायद्याच्या भादंवि कलम 13, 18, 20, 38,39, 120 अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर विजय तिरकी यास 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ऍड. सत्यनाथन, ऍड. सचिन कुंभारे तर आरोपींच्या वतीने ऍड. सुरेंद्र गडलिंग व ऍड. जगदीश मेश्राम यांनी काम पाहिले. या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी न्यायालयाच्या आवारात शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती. न्यायालयाच्या आवारात आज सकाळपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला होता.

उच्च न्यायालयात दाद मागू- ऍड. सुरेंद्र गडलिंग
आज जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना आजन्म कारावास व एका आरोपीस 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर आरोपींचे वकील सुरेंद्र गडलिंग यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालानंतर आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

Web Title: Pro. Saibaba with five others to life imprisonment