भाजप आणि भारिपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

- पारसचा वाद सभागृहात अन् सभागृहाबाहेर
- पाणीपुरवठा योजनेत आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप

अकोला- पारस येथील महाजल घाेटाळ्यावरून बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भारिप-बमंस अाणि विराेधक भाजप सदस्यांमध्ये वाद झाला. आमदारावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने सुरू झालेला हा वाद सभागृहासोबतच सभागृहाबाहेरही पोहोचला होता.

पारस येथील पाणीपुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष अामदार बळीराम शिरस्कार यांच्या कार्यकाळात 70 लाखांच्या योजनेत कामे न करताच रक्कम काढण्यात आल्याचा आरोप भाजप सदस्य रामदास लांडे यांनी आमदारांचा एकेरी उल्लेख करीत केला. त्यामुळे भारिप-बमंसच्या सदस्यांनी भाजपच्या सदस्यांंना सभागृहात माफी मागण्यास सांगितले. अामदारांचा अवमान सभागृहात होत असल्याने सदस्यांनी आधी माफी मागावी असा आग्रह सदस्यांनी धरल्याने दोन्ही पक्षांचे सदस्यांमध्ये सभागृहातच शाब्दिक चकमक सुरू झाली. सभागृहात सुरू झालेल्या या वादावर अखेर विराेधीपक्ष नेते भाजप सदस्य रमण जैन यांनी दिलगिरी व्यक्त करून पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. सभा संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात दोन्ही पक्षांचे सदस्या पुन्हा एकमेकांपुढे आले आणि सभागृहातील वाद पुन्हा उफाळून आला. त्यांच्यात त्याच मुद्यावरून शाब्दिक चकमक झाली. दाेन्ही सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सुदैवाने काही सदस्यांनी मध्यस्थी केल्याचे वाद मिटला.

असा सुरू झाला वाद
सभागृहात पाणीपुरवठा योजनांचा विषय सुरू असताना रामदास लांडे यांनी पारसच्या महाजल योजनेचा मुद्दा उपस्थित केला. सुरुवातीला अध्यक्षांनी त्यांना बोलण्यास मनाई केली. मात्र लांडे यांनी अध्यक्षांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मुद्दा उपस्थित करण्याचा आग्रह धरला. 15 दिवसांत चाैकशी करून कारवाईच्या आश्‍वासनाची त्यांनी जि. प. प्रशासनाला आठवण करून दिली. चर्चा सुरू असतानाच भारिपच्या काही सदस्यांनी अन्य विषय घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे लांडे यांनी या प्रकरणात थेट आमदार बळीराम सिरस्कार यांचा एकरी उल्लेख करीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि वादाला सुरुवात झाली.

ग्रामस्थांच्या सांगण्यावरून अहवाल
पारस येथील महाजल योजनेच्या चाैकशीत कोणतेही लेखी पुरावे नसले तरी ग्रामस्थांच्या सांगण्यावरून माहिती देण्यात येत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशाेर ढवळे यांनी सभागृहात सांगितले.

Web Title: Problem In BJP And BMS In akola