भंगारातून सुटला पोटापाण्याचा प्रश्न

file photo
file photo

भंडारा : दिवाळीचा सण आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने प्रत्येक घरी स्वच्छता व साफसफाई करून रंगरंगोटी केली जाते. घरातील जुन्या व अडगळीत ठेवलेल्या कालबाह्य वस्तू, जुनी पुस्तके, रद्दी व भंगार यांची विक्री केली जाते. या भंगार खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून अनेकांना हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे. 
अनेकांच्या नजरेत भंगार व्यवसायाला विशेष प्रतिष्ठा नाही. परंतु, या व्यवसायात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. 
त्याचप्रमाणे गरीब, गरजू व अल्पशिक्षित बेरोजगारांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. बाराही महिने गावागावांत हातठेल्यावर फिरून भंगार गोळा केले जाते. दरम्यान, दिवाळीच्या काळात व्यावसायिक प्रतिष्ठाने, गॅरेज, वेल्डिंग वर्क्‍स तसेच मशीनरीची कामे करणाऱ्या दुकानांतून बरेच भंगार बाहेर पडते. कापड, किराणा दुकानातून खरडे, प्लॅस्टिकचे रिकामे डबे, बरण्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर घरात स्वच्छता मोहीम राबविली जाते. यात घरातील बरेच भंगार साहित्य व रद्दी विकल्या जाते. 
त्यामुळे आपल्याला सर्वांत जास्त माल विकत घेता यावा, यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. भल्या पहाटेच हातठेला घेऊन शहरात "है क्‍या जुना पुराना लोहा लोखंड टिनटप्पर, प्लॅस्टिक के जुने पुराने जुते चप्पल' अशी हाक देत सध्या हे भंगार गोळा करणारे फिरत आहेत. शाळा शिकणारे काही विद्यार्थी घराला हातभार लावण्यासाठीसुद्धा पार्टटाइम व्यवसाय करतात. 

फक्त रोजीरोटीपुरताच 
शहरात आजच्या घडीला आठ ते दहा भंगार घेणारे ठोक विक्रेते आहेत. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे हातठेले असून किरकोळ भंगार गोळा करणाऱ्यांना ते भाड्याने दिले जातात. गल्लीबोळात फिरून भंगार व रद्दी गोळा केल्यानंतर त्याची ठोक विक्रेत्यांकडे विक्री केली जाते. या मालाची छाटणी होते. त्यानुसार प्रत्येक साहित्याला किलोप्रमाणे वेगवेगळा दर दिला जातो. स्पर्धा अधिक वाढल्याने कधी दिवसभर फिरुनही भंगार मिळत नाही. शिवाय या हंगामात मोठ्या प्रमाणात भंगार निघत असल्याने त्याला दरही घसरले असतात. चांगले भंगार गोळा झाल्यास कधी तीनशे ते चारशे रुपये मिळतात. कधी शंभरावरही समाधान मानावे लागते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com