कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात यवतमाळात घोषणाबाजी;शिवरायांचा पुतळा हटविल्याने शिवसैनिकांचा संताप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

मनगुत्ती या गावातील नागरिकांनी ठराव घेऊन शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात शिवरायांचा पुतळा बसविला. कर्नाटकातील भाजप सरकारला गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय पचनी न पडल्याने त्यांनी पोलिस बंदोबस्त लावून महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांचा पुतळा हटविला.

यवतमाळ : कर्नाटकमधील मनगुत्ती (जि. बेळगाव) या गावात गावकरी व ग्रामपंचायतीच्या संमतीने बसविलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज रविवारी (ता.नऊ) यवतमाळ शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुयरप्पा यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चपला मारीत त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
 

हे वाचा— नागपुरातील लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय...

मनगुत्ती या गावातील नागरिकांनी ठराव घेऊन शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात शिवरायांचा पुतळा बसविला. कर्नाटकातील भाजप सरकारला गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय पचनी न पडल्याने त्यांनी पोलिस बंदोबस्त लावून महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांचा पुतळा हटविला. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री व कर्नाटक सरकारचीच आहे. कर्नाटक सरकारने पुतळा हटविल्याने आता महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यवतमाळ येथेही आज रविवारी दत्त चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे व राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी एकत्र येऊन आपला संताप व्यक्त केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुयरप्पा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे दैवत आहेत. बेळगावात व कर्नाटकातही शिवरायांनी खूप मोठे कार्य केले आहे. कर्नाटकात शिवरायांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक आकस ठेवून शिवरायांचा झालेला हा अपमान आम्ही सहन करणार  नसल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी दिला. "शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ भाजपला साथ' असे म्हणणाऱ्या भाजपच्या मनातील शिवरायांप्रती असलेला आकस दिसून आल्याची टिका याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली. यावेळी निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, तालुकाप्रमुख संजय रंगे, प्रवीण निमोदिया, सागर पुरी, कल्पना दरवई, अमोल धोपेकर, बिल्ला सोळंकी, अनिल यादव, नीलेश बेलोकर, गजानन इंगोले, रवी राऊत, पंकज देशमुख, योगेश भांदक्कर, संतोष चव्हाण, चेतन क्षीरसाठ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे दैवत आहेत. मनगुत्ती गावातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने त्यापासून इतरांना प्रेरणा मिळत होती. मात्र, शिवरायांप्रती आकस असलेल्या कर्नाटकातील भाजप सरकारने छत्रपती यांचा पुतळा हटवून आपल्या नीती व नियत यांमधील फरक दाखवून दिला. राज्यातील जनता छत्रपती शिवरायांचा अवमान कधीही सहन करणार नाही. 
-पराग पिंगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख, यवतमाळ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proclamation against Karnataka CM in Yavatmal; Shiv Sainiks angry over removal of Shivratri statue