प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला 5 कोटींचा गंडा

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला 5 कोटींचा गंडा

नागपूर : कोट्यवधीचे फायनान्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून निर्माता व दिग्दर्शक विपूल शाहा यांच्यासह इतरांना पाच कोटींहून अधिकचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गंडा घालणाऱ्या आरोपींनी स्वत:ची ओळख रॉ, डिफेंस व इंटरपोलचे वरिष्ठ अधिकारी म्हणून करून दिली होती. त्यातील तोतया डिफेंस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 
राजसिंग ऊर्फ राजेशकुमार सिंग रा. झारखंड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विपूल शाहा व विनीत रामलालप्रसाद सिंग (41) रा. ब्रम्हासन सिटी, वडगाव, पुणे असे या प्रकरणातील तक्रारकर्त्यांची नावे आहेत. त्यांची चित्रपट निर्मिती कंपनी आहे. नवीन हिंदी चित्रपटासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर फायनान्सची गरज होती. फायनान्सरचा शोध घेत असताना 2010 मध्ये त्यांची भेट ओळखीचेच असलेले गुरुजी ऊर्फ अख्यकुमार शाहू व विजय नायर यांच्यासोबत झाली. त्यांच्या माध्यमातूनच दोघेही आरोपींपैकी एक असलेले केशव पडोळे यांच्या शिवाजीनगरातील कार्यालयात आले. तिथे नायरने मुख्य आरोपी केशव डी. पडोळे, केशव पडोळे व राजेश कुमार सिंगसोबत ओळख करून दिली. नायरनेच पडोळे हे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन असून त्यांचे मोठे रिसोर्ट आणि सुपर ऍन्टीक आर्टीकलचा व्यवसाय असल्याचे सांगितले. राजेशकुमार हा डिफेन्समध्ये मोठा अधिकारी असून सुपर ऍन्टीक आर्टीकलची शास्त्रज्ञांमार्फत तपासणी करीत असल्याची बतावणी केली. राजेश कुमारे हवे तेवढे फायनान्स मिळवून देण्याचे आमिष दाखविले. 
सोबतच अँटिक आर्टीकल नावाच्या पुरातन नाण्यातून इरिडीयम धातू मिळत असून त्याचा ऍटोमिक रिसर्च, स्पेस रिसर्चमध्ये उपयोग होतो, त्याची किंमत कोट्यवधीच्या घरात असल्याचे सांगून या व्यवसायात खूप पैसा असल्याचेही सांगितले. केवळ माझ्यासोबत मी सांगेल त्या ठिकाणी यावे लागेल, थोडा खर्च करा हवा तेवढा पैसा मिळेल असे स्वप्न दाखविले. विपूल शाहा व विनीत सिंग खर्च करायला तयार झाले. 
2010 ते 2017 या कालावधीत सुपर ऍन्टीक आर्टीकलच्या शोधात नागपूर, भुवनेश्वर, हैद्राबाद, कलकत्ता, हुबळी, खामगाव, मऊ, घोसी, गोरखपरू , ओरीसा, चेन्नई, काठमांडु, बनारस आदी ठिकाणी पाठवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. स्वतःच्या व नातेवाइकांच्या खात्यात रक्कम भरण्यास सांगून दोन्ही तक्रारदारांकडून एकूण 5 कोटी रुपये उकळले. आरोपी राजेश कुमार नागपुरात येणार असल्याची माहिती तक्रारकर्त्यांना होती. त्यांनी माहिती देताच गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
इमेज बिल्डींगसाठी सेमिनार 
आरोपींनी सुपर ऍन्टीक आर्टीकलच्या (आरपी) नावाखाली अनेकांची फसवणूक केली असल्याचीही माहिती पुढे आली आहे. लोकांवर छाप पाडण्यासाठी अरोपींनी विपूल शहा व विनीत सिंग यांची मदत घेतली. त्यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिंना आमंत्रित करून ते मोठमोठे सेमिनार घ्यायचे. याच माध्यमातून आरोपींनी धोकाधाडीच्या व्यवसायाचा विस्तार केला. आरपी व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक झालेल्यांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com