प्रकल्पग्रस्तांचा कुटुंबासह नदीपात्रात ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

मारेगाव (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील सावंगी येथे प्रस्तावित दिंदोडा बॅरेज प्रकल्प उभारण्यासाठी यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करून 20 वर्षे झाली. मात्र, त्याचा मोबदलाही दिला नाही. त्यामुळे नियोजित दिंदोडा प्रकल्पाविरोधात तीनही जिल्ह्यांच्या शेकडो शेतकऱ्यांनी कुटुंबासह आज, शनिवारी वर्धा-वेणा नदीच्या संगमावरील सावंगी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले.
सावंगी संगम येथे प्रस्तावित दिंदोडा बॅरेज प्रकल्प उभारणीसाठी वीस वर्षांपूर्वी जलसंधारण व पाटबंधारे विभागाने यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा-वेणी नदी किनाऱ्यालगतच्या सुपीक जमिनी अधिग्रहीत केल्या.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला देऊन नंतरच्या काळात प्रकल्पनिर्मितीचा मूळ उद्देशच बदलविण्यात आला. मात्र वीस वर्षानंतरही येथे प्रकल्प उभारणीचे काम झाले नाही. शासनाने ही जमीन ताब्यात घेतलीच नसल्याचे वास्तव उजेडात आल्याने फसवणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

एकाही शेतकऱ्याला जमिनीचा पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने या प्रकल्पाला कमालीचा विरोध होत आहे. 7/12 वर जमीन संपादनाचा 2016 साली घेतलेला फेरफार रद्द करावा, प्रकल्पासाठी जमीन संपादित करू नये, शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना निराधार करू नये, योग्य तो मोबदला द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्हा दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या अध्यक्षांनी ठिय्या आंदोलन केले.

यामध्ये समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे, उपाध्यक्ष अभिजित मांडेकर, सचिन साळवे यांच्या नेतृत्वात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीन जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांनी कुटुंबासह नदीपात्रात एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तहसीलदार विजय साळवे यांनी मागण्या शासनापर्यंत पोचविण्याची ग्वाही दिली. मारेगावचे ठाणेदार अमोल माळवे यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त होता.

आंदोलनस्थळी गोसीखुर्द प्रकल्पाचे प्रणेते विलास कोंगाडे, समीक्षा गणवीर, अशोक वर्मा, सामाजिक कार्यकर्ते नेताजी पुरचुंडे, दादा गिरडकर, पोलिस पाटील अविनाश बोबडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पंढरीनाथ ठाकरे, मनोज तेलंग, साळवे, बिडकर, मुकूटबन येथील लता अंकुरे, आलापल्ली येथील गजानन लोणबळ, गुरुदेव सेना मंडळाचे प्रचारक टोंगे, सभापती अरुणा खंडाळकर, भास्कर धातफुले, वैष्णवी साळवे आदींनी भेटी दिल्या.

Web Title: project affected family agitation in river area