तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी निलंबित

file photo
file photo

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी असलेल्या कृषी समृद्धी समन्वयित कृषिविकास प्रकल्पात (केम) झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना बुधवारी (ता. 19) निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत केली. आमदार वीरेंद्र जगताप यांनी याबाबत माहिती दिली.
2016-17 या आर्थिक वर्षात केम अंतर्गत 9 कोटी 88 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यामध्ये तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी गैरव्यवहार केला, अशा अनेक तक्रारी चौकशी समितीचे अध्यक्ष आमदार वीरेंद्र जगताप यांनी शासनदरबारी केल्या. पुस्तक खरेदी, निविष्ठा खरेदी, वाहन टेंडर, शेतीशाळा यासारख्या अनेक विषयांत अनियमितता असल्याचे आज विधिमंडळाच्या प्रश्नोत्तरादरम्यान माहिती मिळाल्यावर मंत्री राम शिंदे यांनी गणेश चौधरी यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
सोबतच 2018-19 मध्ये केम अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या 108 कोटी रुपयांची पूर्ण चौकशी करावी, संबंधित कामामध्ये वित्तीय अनियमितता झाली असल्याने संपूर्ण प्रकल्पात सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेले कंत्राटी व्यक्ती, संस्था व खासगी व्यक्ती यांची पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र यांच्यामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आमदार वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, डॉ. सुनील देशमुख, संतोष टारफे, अमिन पटेल, अस्लम शेख, राजू तोडसाम, रमेश बुंदिले, निर्मला गावित, ऍड. यशोमती ठाकूर, सीमाताई हिरे यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या वेळी त्यांनी उपरोक्त घोषणा केल्याचे श्री. जगताप यांनी सांगितले.

2016-17 व 2018-19 या आर्थिक वर्षातील झालेला खर्च नेमका कोणत्या बाबीवर झाला, याचे उत्तर आम्हाला अजूनपर्यंत मिळाले नाही. जी चौकशी सुरू आहे ती नेमकी कोणत्या वर्षाची आहे, हेसुद्धा कळले नाही. 2018-19 मध्ये 103 कोटींची माहिती मागितली होती, मात्र मंत्र्यांकडून ती 108 कोटींची मिळाल्याने अधिक शंका निर्माण झाली आहे. जोपर्यंत सखोल चौकशी व कारवाई होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही.
- वीरेंद्र जगताप, अध्यक्ष, केम चौकशी समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com