मालमत्तांचा डाटा अद्ययावत करण्यासाठी ‘पीएमसी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - शहरातील मालमत्तांची माहिती अद्ययावत करण्याचे बरेच काम निपटल्यानंतर आता महापालिकेने पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन समिती) नियुक्तीचा स्थायी समितीकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पीएमसीसाठी दोन कोटींच्या खर्चास स्थायी समितीने आज मंजुरी दिली.

नागपूर - शहरातील मालमत्तांची माहिती अद्ययावत करण्याचे बरेच काम निपटल्यानंतर आता महापालिकेने पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन समिती) नियुक्तीचा स्थायी समितीकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पीएमसीसाठी दोन कोटींच्या खर्चास स्थायी समितीने आज मंजुरी दिली.

शहरातील मालमत्तांची माहिती, मूल्यांकन करण्यासाठी महापालिकेने सायबरटेकची नियुक्ती केली. सायबरटेकच्या नियुक्तीसोबतच कोलकाताच्या एका कंपनीला पीएमसी म्हणून नियुक्त केले. परंतु ही कंपनी आलीच नाही. त्यामुळे सायबरटेकने मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले. सायबरटेकने मालमत्तांची माहिती गोळा करताना बरेच घोळ केले. त्यामुळे अनेकांना पूर्वीपेक्षा जास्त कराची देयके पाठविण्यात आली.

महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायबरटेकचा हा घोळ निस्तारला. निश्‍चित कालावधीत शहरातील मालमत्तांचा डाटा गोळा करण्यात सायबरटेक अपयशी ठरली. त्यामुळे त्यांना मुदतवाढही देण्यात आली.

मुदतवाढीनंतरही सायबरटेकचा वेग कासवाचाच होता. परिणामी महापालिकेने अनंत टेक्‍नॉलॉजी कंपनीही नियुक्त केली. तूर्तास शहरातील पाच लाख २७ हजार ४८९ मालमत्तांपैकी ३ लाख १० हजार ५९५ मालमत्तांतून ६ लाख ८४७ युनीटचा डाटा गोळा केला. यात नवीन मालमत्तांचाही शोध लागला असून यात ९५ हजार ६६० युनिटचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पीएमसी नसताना महापालिकेतील कर्मचाऱ्यांनीच मालमत्तांचा सायबरटेकने आणलेला डाटा व्यवस्थित केला. निम्म्यापेक्षाही जास्त डाटा कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित केल्यानंतर कर विभागाने पीएमसी नियुक्तीचा प्रस्ताव पाठविल्याने अनेकांनी महापालिकेला वरातीमागून घोडे, असा टोला हाणला. पीएमसीद्वारे सायबरटेकच्या नियुक्तीपूर्वी गोळा करण्यात आलेला डाटा अद्ययावत करण्यात येईल, असा दावा कर विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी केला.

Web Title: Property Data PMC Municipal