प्रॉपर्टी डीलरच्या मुलाचे अपहरण

file photo
file photo

नागपूर : तीन आरोपींनी एका प्रॉपर्टी डीलरच्या मुलाचे कारमधून अपहरण केले. त्याला रात्रभर फ्लॅटमध्ये डांबून मारहाण केली. आरोपींनी मुलाला सोडण्याच्या बदल्यात तीन लाख रुपये मागितले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीतील तीनही आरोपींना सापळा रचून अटक केली. मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना प्रतापनगरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप घनश्‍याम मेश्राम हे प्रॉपर्टी डीलर असून, त्यांचा मुलगा स्वप्निल हा इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाला आहे. त्याच्या कॉलेजमध्ये आरोपी श्रेयस शेखर बोरकर (वय 25, सुभाषनगर, कामगार कॉलनी) हासुद्धा शिक्षण घेतो. स्वप्निलने श्रेयसकडून 30 हजारांचे कर्ज घेतले होते. त्यावर श्रेयसने चक्रवाढ व्याज लावले होते. त्यामुळे स्वप्निलने थोडे-थोडे करीत सुमारे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्‍कम श्रेयसला दिली होती. मात्र, 16 हजार रुपये देणे बाकी असल्याचे श्रेयस म्हणत होता. मात्र, स्वप्निल एक लाख दिले असून, कर्ज चुकविल्याचे सांगत होता. आरोपी श्रेयस बोरकर व त्याचे दोन मित्र राहुल डिगांबर मेश्राम (वय 24, गोपालनगर) आणि दिनेश नत्थूजी शहाने (वय 25, भामटी) यांनी स्वप्निलचे अपहरण करून त्याच्या वडिलाकडून तीन लाख रुपयांची खंडणी वसुली करण्याचा कट रचला. 28 एप्रिलला सकाळी आठ वाजता स्वप्निल दुचाकी घेऊन बाहेर पडला. तीनही आरोपींनी त्याला फोन करून कुठे आहेस? अशी विचारणा केली. त्याने तुकडोजी पुतळा चौकातील साई लॉज येथे बोलावले. तेथून कारमध्ये कोंबून स्वप्निलचे अपहरण केले. त्याला आयटी पार्क परिसरात आणल्यानंतर तीन लाखांची खंडणी मागितली. सीसीडी कॅफेजवळील राधे मंगलम इमारतीजवळ आणल्यानंतर त्याला त्याच्या वडिलांना फोन करण्यास सांगितले. त्याला प्रतापनगरातील सूर्या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. फोनवरून तीन लाखांची व्यवस्था करण्यासाठी वडिलांना सांगितले.
फ्लॅटमध्ये रात्रभर मारहाण
आरोपी श्रेयस, दिनेश आणि राहुल यांनी स्वप्निलला रात्रभर मारहाण केली. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. वडिलाने पैसे न दिल्यास गळा चिरून खून करण्याचा कट असल्याचे सांगितले. रात्रभर त्याला अशाप्रकारे टॉर्चर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
असा रचला सापळा
स्वप्निलने सांगितलेल्या पत्त्यावर तीन लाख रुपये नेऊन देण्याची तयारी दर्शविण्यास मेश्राम यांना सांगण्यात आले. त्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी सापळा रचला. सापळा रचल्यानंतर अचून फ्लॅट शोधून पोलिसांनी कारवाई केली. तीनही आरोपींना अटक केली.
"ती' युवती कोण?
श्रेयस बोरकर, दिनेश शहाणे आणि राहुल मेश्राम यांच्या फ्लॅटवर रात्रभर एक युवती होती. ती युवतीसुद्धा या अपहरणाच्या आणि खंडणी वसुलीच्या कटात सामील होती. ती युवती कोण, असा प्रश्‍न पडला आहे. त्या युवतीला पोलिसांनी सोडून दिले. तिचा कुठेही उल्लेख येऊ नये म्हणून पोलिसांनी काळजी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com