विरोधाला न जुमानता प्रयोग करणारच- शरद पोंक्षे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

सभागृहाला छावणीचे स्वरूप 
राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला पोलिसांनी गांभीर्याने घेतले. त्यामुळे सायंकाळी सहापासूनच देशपांडे सभागृहाला सुरक्षेसाठी पोलिसांनी वेढा घातला होता. अंबाझरी, मानकापूर, सदर, सीताबर्डी, गिट्टीखदान, धंतोली या पोलिस ठाण्यातील जवळपास 120 पोलिस कर्मचारी सुरक्षाव्यवस्थेत सहभागी होते. 

नागपूर - "आमच्याकडे 'हे राम...नथुराम' नाटकाचे सेन्सॉरचे प्रमाणपत्र आहे. नाटक कायद्यातूनही मुक्त झाले आहे. त्यामुळे आम्ही विरोधाला न जुमानता प्रयोग करणारच,' असे प्रत्युत्तर विरोध करणाऱ्यांना अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिले. 

यापूर्वी सलग पाच प्रयोग नागपुरात केले, तेव्हा कुणीही विरोधाला आले नव्हते. आता हे केवळ महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे स्टंट करीत आहेत. एखाद्या नाटकाने महात्मा गांधी यांचा विचार मरणार नाही, हे माहिती असताना विरोध कशाला करता?' असा प्रश्न शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला.

'हे राम...नथुराम'ला जोरदार विरोध 
राज्यभरातील तीव्र विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या "हे राम...नथुराम' नाटकाचा प्रयोग रोखण्यासाठी नागपुरातही रविवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाबाहेर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तब्बल अडीच तास घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्‍ते अतुल लोंढे, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व दहाच्या सुमारास प्रयोग सुरळीत सुरू झाला. 
"महात्मा गांधी अमर रहे', "नथुराम गोडसे मुर्दाबाद', "शरद पोंक्षे मुर्दाबाद'च्या घोषणा देत सायंकाळी सातपासून देशपांडे सभागृहाबाहेर विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली. "नथुरामचा प्रयोग बंद करा' अशी मागणी ते पोलिसांकडे करीत होते. मात्र, सायंकाळपासूनच मुख्य प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सीताबर्डी, गिट्टीखदान, सदर, धंतोली, मानकापूर, अंबाझरी पोलिस व दंगा नियंत्रण पथकासह 120 पोलिसांचा ताफा याठिकाणी तैनात होता. बॅरिकेड्‌स लागल्याने कुणीही आत येण्याचा प्रयत्न करू शकले नाही. आठच्या सुमारास पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना परत जाण्याचा इशाराही दिला. त्यानंतर मात्र निदर्शनाचा जोर अधिक वाढल्याने दंगा नियंत्रण पथकाला सज्ज राहावे लागले. साडेनऊ वाजता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पोलिस व्हॅनमध्ये टाकून सीताबर्डी पोलिस ठाण्याकडे नेले. मात्र, काढलेल्या तिकिटांचे पैसे परत घेऊ द्या, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केल्याने पुन्हा एकदा सभागृहावर दाखल झाले. आयोजकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने अखेर पोलिस व्हॅन सीताबर्डीकडे रवाना झाली. दरम्यान, प्रयोग सुरू होण्याच्या दहा मिनिटांपूर्वी पोलिसांनी सभागृहाच्या आतून काही संशयितांना बाहेर काढले. प्रयोग सुरू असताना गोंधळ घातल्यास पोलिस बळाचा वापर करण्यात येईल, असा इशारा दिल्याने काहींनी स्वतःहून पळ काढला. दहा वाजता प्रयोग सुरू झाला, तेव्हा पोलिसांचा ताफाही सभागृहात उपस्थित होता. मात्र, गोंधळामुळे अनेक प्रेक्षकांनी नाटक न बघताच सभागृह सोडले. 

अग्निहोत्री थेट व्हीआयपी रूममध्ये 
उमाकांत अग्निहोत्री यांनी तिकीट दाखवून सभागृहात प्रवेश घेतला. त्यावेळी तीस ते चाळीस प्रेक्षक आत होते. पाच-दहा मिनिटे शांत बसल्यानंतर उमाकांत अग्निहोत्री थेट रंगमंचाकडे आले. त्यावेळी सेट लावणे सुरू होते. त्यांनी रंगमंचावरून मागे जात व्हीआयपी रूममध्ये प्रवेश घेतला. त्याठिकाणी शरद पोंक्षे उपस्थित होते. त्यांनी थेट पोंक्षेंवर निशाणा साधला. मात्र, शिवसेनेचे उपशहरप्रमुख रविनिश पांडे त्याठिकाणी दाखल झाले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत अग्निहोत्रींना बाहेर काढले. 

सभागृहाला छावणीचे स्वरूप 
राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला पोलिसांनी गांभीर्याने घेतले. त्यामुळे सायंकाळी सहापासूनच देशपांडे सभागृहाला सुरक्षेसाठी पोलिसांनी वेढा घातला होता. अंबाझरी, मानकापूर, सदर, सीताबर्डी, गिट्टीखदान, धंतोली या पोलिस ठाण्यातील जवळपास 120 पोलिस कर्मचारी सुरक्षाव्यवस्थेत सहभागी होते. 

उपायुक्‍त कलासागर यांची "कसरत' 
पोलिस उपायुक्‍त राकेश कलासागर यांच्याकडे देशपांडे सभागृहाचा बंदोबस्त होता. सभागृहाच्या दोन्ही दारांवर आंदोलक असल्यामुळे उपायुक्‍त कलासागर यांना चांगलीच "कसरत' करावी लागली. मात्र, पीआय सत्यवीर बंडीवार, सुधीर ढोणे, अतुल सबनीस आणि राजन माने यांच्या साथीने कलासागर यांनी किल्ला लढवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवून कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही, हे विशेष. 

विनापरवानगी आंदोलन 
"हे राम... नथुराम' नाटकाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. सीताबर्डीचे पीआय बंडीवार यांनी आंदोलनकर्त्यांना वारंवार सूचना दिल्या. त्यानंतर मात्र, आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. 
 
शिवसेना "रक्षका'च्या भूमिकेत 
औरंगाबादप्रमाणे नागपुरातही शिवसेना प्रयोगासाठी रक्षकाच्या भूमिकेत होती. उपशहरप्रमुख रविनिश पांडे यांच्या नेतृत्वात 25 कार्यकर्ते सभागृहाच्या आत व 25 बाहेर होते. दोन्ही मोर्चांवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे आक्रमण थोपवून लावण्यासाठी ते सज्ज झाले होते. शरद पोंक्षे यांनी "सर्व शिवसैनिक माझे व्हीआयपी आहेत' असे पोलिसांना सांगितले.

Web Title: protest to stop the performance of controversial Marathi play Hey Ram Nathuram