आंदोलकांनी महापालिकेत टाकली घाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

- शिवाजी पार्कच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्‍न गाजतोय
- छत्रपती शिवाजी पार्क संघर्ष समितीचे आंदोलन
- शिवाजी उद्यानातील घाणीच्या प्रश्‍नावर थेट महापालिकेत धडक

अकोला : छत्रपती शिवाजी पार्क संघर्ष समितीने उद्यानातील घाणीच्या प्रश्‍नावर थेट महापालिकेत धडक दिली. शिवाजी पार्कमधील मटक्यात आणलेली घाण महापालिकेत आयुक्तांच्या दालनापुढे मटके फोडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

आंदोलकांचा रोष बघता महापालिका प्रशासनानेही तातडीने पावले उचलीत शिवाजी पार्कला लागून असलेल्या नाल्याची स्वच्छता केली. येथील नाल्याचा तुटलेल्या भागाचे बांधकाम करून पार्कमध्ये घाण पाणी येणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

महापालिकेच्या अधिपत्याखालील शिवाजी पार्कच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्‍न सध्या गाजतो आहे. शिवाजी पार्क संघर्ष समितीने चार दिवसांपासून पार्कच्या प्रवेश द्वारापुढे आंदोलन सुरू केले आहे. तीन दिवस संयमाने धरणे देणाऱ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी महापालिकेत धडक देत आंदोलन तीव्र केले. शिवाजी पार्कमधील घाणीचा प्रश्‍न प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असल्याने पार्कमधील घाण मटक्यात भरून आणत ती महापालिका आयुक्तांच्या दालनापुढे मटके फोडून टाकण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत हा प्रश्‍न तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले.

...तर आंदोलन आणखी तीव्र करू
शिवाजी पार्कच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्‍न तातडीने निकाली काढला नाही तर आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेच्या वेळी दिला. अनेक वर्षांपासून पार्कमधील समस्या जैसे थे आहेत. त्या शिवाजी महाराज जयंतीपूर्वी सोडविण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना केली. यावेळी शिवाजी पार्क संघर्ष समितीच्या वतीने आयुक्तांना निवेदनही देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protesters dumped dirt in the akola municipal corporation