शुद्ध पाण्यासाठी पारशिवनीकर रस्त्यावर; नागरिकांचा नगरपंचायतीवर मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

शहरात कावीळ, गॅस्ट्रो व इतर आजार पसरले असताना नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेकदा काळ्या पाण्याबाबत नगरपंचायतीकडे तक्रार केल्या.

पारशिवनी (जि. नागपूर) : मागील वर्षभरापासून पारशिवनीतील नागरिकांना नळातून अशुद्ध व काळ्या रंगाचे पाणी येत असल्याची तक्रार अनेकदा नगरपंचायतीकडे केली. मात्र, त्यावर तोडगा काढण्यास प्रशासन दिरंगाई करीत असल्याने अखेर संतापलेल्या नागरिकांनी नगर परिषदेवर अभूतपूर्व मोर्चा काढून निषेध नोंदविला. प्रशासनाविषयी रोष व्यक्त करण्यासाठी पारशिवनीकरांनी बंदही पाळला. 

जनतेत रोष वाढतच होता
शहरातील नागरिकांच्या घरी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होत असताना नळाला येणारे पाणी गढूळ व काळ्या रंगाचे आहे. यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान शहरात कावीळ, गॅस्ट्रो व इतर आजार पसरले असताना नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेकदा काळ्या पाण्याबाबत नगरपंचायतीकडे तक्रार केल्या. यासंदर्भातील वृत्त वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर पाइपलाइन खराब झाली असून ती बदल्याची गरज आहे. मात्र निधी मिळाला नसल्याने काम होत नसल्याचे कारण नगरपंचायत प्रशासनाने दिले. मात्र, दुसरीकडे जनतेत रोष वाढतच होता. सोमवारी नागरिकांनी काळे पाणी येत असल्याची तक्रार मुख्याधिकारी भारत नंदनवार यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिक आणखीच संतापले. रात्री मोर्चा काढण्याचा
निर्णय घेण्यात आला. 

मुख्याधिकाऱ्यांना हटविण्यासाठी ठराव
मंगळवारी सकाळपासूनच बाजारपेठ बंद होती. नागरिक हळूहळू एकत्र आले. बॅंडबाजा लावून नागरिकांनी मोचर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व कोणत्याही राजकीय पक्षांनी केले नाही तर स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी नारे लावत. नगर पंचायत प्रशासन व नगरसेवकांचा विरोध सुरू केला. नागरिक नगरपंचायतीवर धडकले. येथे मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचवेळी काही नगरसेवकांनी मोर्चा सांभाळत मुख्याधिकाऱ्यांना हटविण्यासाठी ठराव घेण्याचे जाहीर केले. यानंतर मोर्चेकरी शांत झाले. येत्या दोन दिवसांत नागरिकांना शुद्ध पाणी मिळाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. 
 
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल 
नागपूचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पारशिवनी शहरात होत असलेल्या काळ्या पाण्याच्या वृत्ताची दखल घेत मुख्याधिकारी भारत नंदनवार यांना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतल्याची माहिती घेतली. कोणत्याही परिस्थितीत पारशिवनीच्या नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. 

एकत्र आले सारे शहर 
पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असतान त्याची दखल घेतली जात नसल्याने पारशिवनीचे नागरिक मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज सकाळी सर्व मोठ्या विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली तर लहान विक्रेतेदेखील मोर्चात सहभागी होण्यासाठी त्यांची दुकाने बंद करून सहभागी झाले. यामुळे सारे शहर पाण्याच्यामुद्द्यावर एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protests for pure water in parshioni