नागपुरात सायको स्टॅबरचा महिलांवर हल्ला

File photo
File photo

नागपूर : सायको स्टॅबरने एका पाठोपाठ केलेल्या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्या. शुक्रवारी भल्या पहाटे शारदा चौक, जवाहरनगरात घडलेल्या या घटनेने पोलिस दलासह उपराजधानीत खळबळ उडवून दिली. संपूर्ण घटनाक्रम सीसीटिव्हीत कैद झाला आहे. 2017 च्या प्रारंभी सायको स्टॅबरने एका पाठोपाठ सात महिलांना जखमी केले होते. या घटनांमधील आरोपीनेच यावेळीही हल्ले केल्याचा कयास लावला जात असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
सविता मानेकर (48) रा. इंदिरा गांधी हायस्कूल मागे, जवाहरनगर आणि मालू राऊत (45) बिडीपेठ, तुकोबाग्राम अशी जखमी महिलांची नावे आहेत. मानेकर या गृहिणी आहेत तर राऊत या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला आहेत. सकाळी सहा वाजताच्या सुमारास उजाडण्यापूर्वीच मानेकर या घरासमोरच फिरत होत्या. गेटपासून काही पावलांवरच दुचाकीवरून आलेल्या आरोपीने पाठीवर वार करीत जखमी केले. घटनेनंतर मानेकर आरडाओरड करीत घरी परतल्या. लगतच्या बोळीतून राऊत या कामासाठी जात होत्या. मानेकर यांच्यावर वार केल्यानंतर पळून जात असताना सायको स्टॅबरने राऊत यांच्यावरही वार केला. त्यांनीही आरडाओरड केली. परिसरातील नागरिक धावून आले. दोघींनाही नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छोटेखानी शस्त्राने वार करण्यात आल्याने घावाची तीव्रता कमी असली तरी मोठ्याप्रमाणावर रक्त वाहिले. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्‍वर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
एकटी महिला किंवा तरुणीला गाठून तिच्यावर हल्ला करण्याची "मोडस अप्रेंडी' 2017 मधील घटनांमध्ये होती. त्यावेळी काही घटनांमध्ये आरोपीने पल्सर मोटारसायकल वापरल्याचे पुढे आले होते. जंग जंग पछाडूनही त्याला अटक करणे शहर पोलिस दलाला शक्‍य होऊ शकले नाही. शुक्रवारच्या हल्ल्यांमध्ये पुन्हा तीच पद्धती अवलंबिण्यात आली. सातत्याने घडणाऱ्या या घटना म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आव्हान असल्याची प्रतिक्रिया आज परिसरात उमटली होती.
परिसरात पुन्हा दहशत
दोन वर्षांपूर्वी महिलांवर हल्ल्याच्या मालिकेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. आजच्या घटनेने जुन्या प्रकरणांनाही उजाळा मिळाला. जवाहरनगरातील महिला आणि तरुणींनी एकत्र येत आरोपीला पकडण्याची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी याच भागात सायको स्टॅबरची भीती होती. महिला घराबाहेर पडायलाही घाबरत होत्या. अलीकडेच महिला घराबाहेर पडू लागल्या होत्या. पुन्हा सायको स्टॅबरने हल्ले केल्याने महिला सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आल्याची भावना परिसरातील महिलांनी व्यक्त केली.

छोटे शस्त्र वापरून आरोपीने वार केल्याचे दिसते. यापूर्वीसुद्धा रघुजीनगर, सक्करदरा, अजनी भागात अशा घटना घडल्या होत्या. पद्धती एकच असल्याने सायको स्टॅबरने या घडविल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. संबंधित पोलिसांना कारवाईसंदर्भात सूचना दिल्या आहेत. सकाळच्या वेळी संपूर्ण परिसरात पॅट्रोलिंग केली जाईल. नागरिकांनीही दक्ष राहावे, कुणी संशयित आढळल्यास पोलिसांना सूचना द्यावी.
-नीलेश भरणे, पोलिस उपायुक्त.

सकाळी घरासमोर फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने अचानक हल्ला केला. घटनेनंतर न थांबता तो पळून गेला. त्याचा चेहरा किंवा गाडी कोणती ते बघितले नाही. कोणत्या शस्त्राने वार केला तेसुद्धा माहिती नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-सविता मानेकर, पीडित महिला.

कामासाठी परातेगल्लीतून पायी जात असतानाच आरोपीने मागून येऊन पाठीमागे वार केला. आरोपीला ओळखत नाही. आरोपीने निळा शर्ट घातल्याचे बिघतले.
-मालू राऊत, जखमी सफाई कर्मचारी.

2017 मधील घटना
रेशीमबाग : स्नेहा नागरमोथे (30), 3 जानेवारी, रात्री 8 वाजता.
नवीन बिडीपेठ : प्रेमलता भोयर (31), 19 जानेवारी, रात्री 8 वाजता.
खानखोजेनगर : मनोरमा गोडबोले (58), 19 जानेवारी, रात्री 9 वाजता.
दत्तात्रयनगर : जुई हेडाऊ (19), 22 जानेवारी, रात्री 9.45 वाजता.
हनुमाननगर : शोभा ठाकूर (55), 30 जानेवारी, रात्री 8.15 वाजता.
रेशीमबाग : चंद्रकला ढेंगे (50), 30 जानेवारी, रात्री 8.30 वाजता.
नालंदानगर : रेखा पवार (30), 6 फेब्रुवारी, दुपारी 1 वाजता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com