अजनीत पबजीचा बळी, विद्यार्थ्याची आत्महत्या

अजनीत पबजीचा बळी,  विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर : तासनतास मोबाईलवर पबजी गेम खेळण्यात व्यस्त राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्‍य आल्याने घराशेजारील इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी अजनीत घडली. बॉबी ऊर्फ अमन शंकर मानके (वय 19, रा. धाडीवाल ले-आउट, अजनी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉबी मानके हा शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये बीबीएचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. मोठा भाऊ उच्चशिक्षित असून तो मुंबईत नोकरी करतो. बॉबीचे मात्र, शिक्षणावर विशेष लक्ष नव्हते. बॉबीच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलवर तो तासनतास पबजी गेम खेळत होता. तो पबजीमध्ये एवढा व्यस्त राहायचा की पहाटेपर्यंत तो पबजी खेळत जागत होता. त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यासह मानसिकतेवरही झाला. मोबाईलच्या वेडापायी तो अनेकांवर चिडचिड करायचा. पबजी खेळण्यावरून टोकल्यास तो शिवीगाळ करायचा किंवा चिडून घरातून बाहेर पडत होता. पबजी प्रेम पाहता आई किंवा वडीलही त्याच्यासमोर हतबल झाले होते. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास तो पबजी गेम खेळत-खेळतच घराबाहेर पडला. "मी हरलो...मी हरलो' असे म्हणत तो घराबाहेर पडला. सुयोगनगर चौक येथील श्री शुभम अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर तो चढला. त्याने तेथून खाली उडी घेतली. काही क्षणातच तो रक्‍ताच्या थारोळ्यात पडून मृत पावला. शेजाऱ्यांनी एकच गर्दी करीत त्याच्या आईला घटनास्थळावर नेले. बॉबीचा मृतदेह पाहताच त्याच्या आईने हंबरडा फोडला. लगेच अजनी पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी योगेश नरांजे (वय 31) यांच्या सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com