सार्वजनिक बांधकाम विभाग लागला कामाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

नागपूर - पावसाळी अधिवेशन कुठे घ्यायचे याचा अद्याप निर्णय झाला नसला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्‍यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याने आगामी अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. शिवसेनेचा अधिवेशन येथे घेण्यास विरोध आहे. 

नागपूर - पावसाळी अधिवेशन कुठे घ्यायचे याचा अद्याप निर्णय झाला नसला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्‍यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याने आगामी अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. शिवसेनेचा अधिवेशन येथे घेण्यास विरोध आहे. 

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पुढील अधिवेशनाची तारीख आणि स्थळ विधानसभा अध्यक्ष जाहीर करतात. यंदा मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. चार जुलै अधिवेशनाची तारीख जाहीर झाली मात्र स्थळ अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मागील हिवाळी अधिवेशनात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचे सूतोवाच केले होते. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनीही राज्य शासनाचा तसा विचार सुरू असल्याचे म्हटले होते.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुद्द विधानसभेत याबाबत विचारणा केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वांसोबत बोलून निर्णय घेऊ असे सांगून विषय टाळला होता. 

पावसाळी अधिवेशनाबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली आहे. मुंबईत जोरदार पाऊस पडतो. कामकाजात खोळंबा होतो. यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेणे सोयीचे राहील, असा अहवाल सादर केला आहे. 

अधिवेशनाच्या संदर्भात नागपूरच्या अधिकऱ्यांची एक बैठक मुंबईला काही दिवसांपूर्वी घेण्यात आली. त्यात पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना बोलावण्यात आले होते. 

आता सार्वजनिक बांधकाम विभागाला तयारी करण्याची मौखिक सूचना देण्यात आली असल्याने पावसाळी अधिवेशन नागपुरातच होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार निवास, रविभवन, नागभवन, विधानभवन, १६० गाळेची देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात असून शासनास सादर करण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर कामासाठी निविदा काढण्यात येतील. सहा महिन्यांपूर्वीच अधिवेशन झाल्याने किरकोळ दुरुस्तीचीच कामे करण्यात येतील. 

पाऊस लक्षात विशेष तयारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

कोंडी करण्‍याचा प्रयत्‍न
राज्य शासनाचे यावर जवळपास एकमत झाले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांचा यास विरोध आहे. रत्नागिरीतील नाणेर प्रकल्प विदर्भात नेल्यास आपण पावसाळी अधिवेशन नागपूर घेण्यास मंजुरी देऊ असे जाहीरपणे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Works Department