वकिलावर हल्ला; 7 वर्षे कारावास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

नागपूर - कर्जवसुली प्रकरणातील खटला लढण्यास नकार दिल्यामुळे वकिलाच्या डोक्‍यावर हातोडीने वार करणारा कमलाकर घायवट (45, रा. मानेवाडा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. शुक्‍ला यांनी 7 वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला. आरोपीवर ऍड. नरेंद्र डी. ठोंबरे (रा. आशालक्ष्मी अपार्टमेंट, रविनगर) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

आरोपीने श्रीराम फायनान्सकडून दीड ते दोन लाखांचे कर्ज घेतले होते. परंतु, ठराविक मुदतीत कर्ज फेडू न शकल्याने कंपनीने आरोपीविरोधात खटला दाखल केला. त्यामुळे कमलाकरने ऍड. नरेंद्र ठोंबरे यांच्याशी संपर्क साधत खटला लढण्याची विनंती केली. ठोंबरे यांनी कागदपत्रे तपासून कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ मिळू शकेल. मात्र, कर्ज माफ होण्याची कुठलीही शक्‍यता नसल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात फायनान्स कंपनीने आरोपीवर "रिवार्ड' घोषित केला. यामुळे आरोपीने 12 नोव्हेंबर 2012 ला सकाळी 9 वाजता ठोंबरे यांच्या घरी जाऊन खटल्यासंबंधित कागदपत्रांची मागणी केली. ऍड. ठोंबरे कागदपत्रे देण्यास वळले असता आरोपीने पिशवीतून हातोडी काढली आणि ठोंबरेंच्या डोक्‍यावर पाच-सहा वार केले.

ठोंबरे यांच्या आवाजामुळे पत्नी शीतल व मुले धावून आलीत. यावेळी आरोपीने ठोंबरे यांच्या पत्नीवरही हल्ला केला. यामध्ये शीतल यांच्या डोक्‍याला मार बसला व हात फ्रॅक्‍चर झाला. तर ठोंबरे यांच्या डोक्‍याला 24 टाके लागले. आरोपीला शेजाऱ्यांनी पकडून अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी सर्व साक्षीपुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने नमूद शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ऍड. नीरज खांदेवाले, ऍड. समीर सोनवणे, ऍड. विजय मोरांडे यांनी सहकार्य केले.

Web Title: punishment by attack on lawyer