कोट्यवधींचा महसूल, सुविधांवर आखडता हात

बॉटनिकल गार्डन - पर्यटकांना बसण्यासाठी तयार केलेल्या हटची अशी दुर्दशा झाली.
बॉटनिकल गार्डन - पर्यटकांना बसण्यासाठी तयार केलेल्या हटची अशी दुर्दशा झाली.

नागपूर - दरवर्षी कोट्यवधींचा महसूल गोळा करूनही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (पीडीकेव्ही) जबाबदार अधिकाऱ्यांनी आखडता हात घेतल्याने शहरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या बॉटनिकल गार्डनची दुरवस्था झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपूरकरांच्या विरंगुळ्याचे केंद्र बंद असून देखभाल, दुरुस्तीच्या नावावर सरकारकडूनही आठ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये गिळंकृत करणाऱ्या पीडीकेव्हीने शहराच्या पर्यटनाचा खेळखंडोबा केल्याचे चित्र आहे. 

फुटाळा तलावाच्या कुशीतील बॉटनिकल गार्डनचे आकर्षण नागपूरकरांत मोठे असूनही गेल्या  काही महिन्यांपासून ते बंद आहे. या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पीडीकेव्हीची असून, यासाठी निधी कुठून आणायचा, याबाबतही मार्ग निश्‍चित आहे. वर्षभर कंत्राटदाराला एका निश्‍चित रकमेत उद्यान दिले जाते. 

२०१६-१७ या वर्षात या उद्यानासाठी ७० लाख रुपये निविदेद्वारे पीडीकेव्हीकडे आल्याचे सूत्राने नमूद केले. ही रक्कम एका वर्षाची असून यापूर्वीही दरवर्षी लाखो रुपये उद्यानासाठी निविदेद्वारे आले. एवढेच नव्हे आठ वर्षांपूर्वी २००० मध्ये सरकारकडूनही ५ कोटी रुपये मिळाल्याची पुश्‍ती सूत्राने जोडली. 

दरवर्षी लाखो रुपये कंत्राटदाराकडून तसेच आठ वर्षांपूर्वी ५ कोटी सरकारकडून घेऊनही या उद्यानावर खर्च करण्यात पीडीकेव्ही हात आखडता का घेत आहे? उद्यानाच्या देखभालीसाठी वर्षात १२ लाख तर सुरक्षारक्षकांवर वर्षाला अंदाजे ८ लाख, असा २० लाखांचाही खर्च वजा केल्यास मागील वर्षातील ५० लाख कुठे गेले? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ वसुली करण्याचाच एकमेव धंदा पीडीकेव्हीने सुरू केला की काय? अशी शंका पर्यटक उपस्थित करीत आहेत.  

कारंजे बंदच
आठ वर्षांपूर्वी सरकारकडून मिळालेल्या पाच कोटीत या उद्यानात रस्ते तयार करण्यात आले. एक तिकीट काउंटर, ऑफिस, जलकुंभ व फाऊंटेन तयार करण्यात आले. परंतु, यातील फाऊंटेन आजपर्यंत सुरू झाले नसल्याचे सूत्राने नमूद केले. याशिवाय फुटाळा तलावाच्या बाजूला काही झोपड्या बसण्यासाठी बांधल्या, त्याचीही दुर्दशा झाली आहे. 

असुविधांमुळे पर्यटकांऐवजी प्रेमीयुगुल
या उद्यानाच्या चारही बाजूने संरक्षक भिंतीचा अभाव आहे. फुटाळा तलाव परिसरात तारेचे कुंपण असल्याने पाण्याची पातळी वाढल्यास ते थेट उद्यानात शिरते. पर्यटकांना बसण्यासाठी बाकं नसून साधे पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. त्यामुळे कुटुंबीय या उद्यानाकडे फिरकत नाही. याचा लाभ थेट आतापर्यंत प्रेमीयुगुल घेत होते. 

मध्यंतरी निविदा काढल्या, परंतु ते पूर्णत्वास आले नाही. आता लवकरच या उद्यानासाठी निविदा काढण्यात येईल. निविदेतून जो पैसा येतो, तो उद्यानावर खर्च करण्यात येते. देखभालीचे कामही थर्ड पार्टीकडे देण्यात येईल तसेच त्यावर स्थानिक प्राध्यापकांना नियंत्रणाची जबाबदारी देण्यात येईल. येत्या दोन-तीन महिन्यांत निश्‍चितच चांगले दिसून येईल. 
- डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com