नोव्हेंबरमध्ये विदर्भात "पणन'ची कापूस खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

दरवर्षी दिवाळीपूर्वी जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी प्रारंभ होत होती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापूस खरेदीचा हा मुहूर्त चुकत आला आहे. यंदाही दिवाळीचा मुहूर्त चुकला आहे. निवडणुकीच्या धामधूमीत कापूस खरेदी दिवाळीनंतरच होण्याची शक्‍यता आहे. यामुळे एक नोव्हेंबरनंतरच कापूस खरेदीचा श्रीगणेशा होण्याची शक्‍यता आहे.

यवतमाळ : यंदाही राज्य कापूस पणन महासंघाची कापूस खरेदी दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्‍यता आहे. राज्यभरात "पणन'ची कापूस खरेदी एक नोव्हेंबरनंतर सुरू होणार असून, शेतकऱ्यांच्या नजरा कापूस खरेदी केंद्रांकडे लागलेल्या आहेत. यापूर्वी धनत्रयोदशीपासून खासगी बाजारात खरेदीला प्रारंभ करण्यात येणार आहे. 
दरवर्षी दिवाळीपूर्वी जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी प्रारंभ होत होती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापूस खरेदीचा हा मुहूर्त चुकत आला आहे. यंदाही दिवाळीचा मुहूर्त चुकला आहे. निवडणुकीच्या धामधूमीत कापूस खरेदी दिवाळीनंतरच होण्याची शक्‍यता आहे. पणन महासंघाने खरेदीची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. जिनिंगकडून करारनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, शासनाकडून परवानगी येणे बाकी आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढील प्रक्रियेला गती येण्याची शक्‍यता आहे. यामुळे एक नोव्हेंबरनंतरच कापूस खरेदीचा श्रीगणेशा होण्याची शक्‍यता आहे. पाच हजार 550 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव शासनाने जाहीर केला आहे. केंद्र सुरू न झाल्यास यापेक्षा कमी दरात कापूस खरेदी होण्याची शक्‍यता आहे. यामुळे या केंद्राचा शेतकऱ्यांना आधार आहे. केंद्र सुरू झाल्यास या दरापेक्षा कमी दर मिळण्याची शक्‍यता नाही. 
पावसामुळे सध्या कापूस बाजारात येण्यास विलंब होत आहे. मात्र, धनत्रयोदशीपासून खासगी बाजारात कापूस खरेदी मुहूर्ताचा शुभारंभ होत आहे. दरवर्षी अनेक व्यापारी याच दिवसापासून कापूस खरेदीला सुरुवात करतात. यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा पणन महासंघाच्या केंद्राकडे लागल्या आहेत. 

शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून पणन महासंघामार्फत खरेदी केली जाते. हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, असा आमचा प्रयत्न आहे. खरेदीचे नियोजन जवळपास पूर्ण झाले असून, कापूस खरेदीची सुरुवात विदर्भातून केली जाणार आहे. 
- सुरेश चिंचोळकर, संचालक, पणन महासंघ. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purchase of cotton by cotton federation in Vidarbha in November