पानमसाला विकून मुलांना बनविले उच्चशिक्षित

नरेंद्र चोरे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मानकापूर  : मुलांनी उच्च शिक्षण घेऊन खुप मोठे व्हावे व त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, या उद्‌देशाने मनोहरे दांपत्याने आयुष्यभर काबाडकष्ट केले. रक्‍ताचे पाणी करून आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलांनीही मायबापाच्या कष्टाचे चीज केले. मनोहरे परिवारातील एक मुलगा पुण्यात आर्किटेक्‍चर असून, दुसरा आयआयटी रुडकीत उच्च शिक्षण घेत आहे.

मानकापूर  : मुलांनी उच्च शिक्षण घेऊन खुप मोठे व्हावे व त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, या उद्‌देशाने मनोहरे दांपत्याने आयुष्यभर काबाडकष्ट केले. रक्‍ताचे पाणी करून आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलांनीही मायबापाच्या कष्टाचे चीज केले. मनोहरे परिवारातील एक मुलगा पुण्यात आर्किटेक्‍चर असून, दुसरा आयआयटी रुडकीत उच्च शिक्षण घेत आहे.
मानकापूर परिसरातील जयहिंदनगरमध्ये राहणारे पुरुषोत्तम मनोहरे यांनी आयुष्यभर मंडप डेकोरेशनचा व्यवसाय केला. दिवसरात्र मेहनत करीत असताना अचानक एकेदिवशी त्यांच्या पाठीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे 1989 मध्ये मेयोमध्ये मणक्‍यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर बरे होण्याऐवजी ते बेडवर आले. त्यानंतर 2010 मध्ये मेडीकलमध्ये आणखी एक शस्त्रक्रिया झाली. तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. डॉक्‍टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही ते धडधाकट होऊ शकले. त्या दिवसापासून तीन चाकी सायकल हेच त्यांचे आयुष्य बनले. खाणेपिणे व फिरणे सर्वकाही तीनचाकी सायकलीवरच. त्याही परिस्थितीत मनोहरे यांनी हार मानली नाही. दोन्ही मुलांना शिकवून स्वत:च्या पायावर उभे करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. पै-पै जमा करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना बाहेरगावी उच्च शिक्षणासाठी पाठविले. नातेवाईकांनीही बरीच मदत केली. पत्नी पार्वतीनेही मिळेल ते काम करून पतीच्या स्वप्नाला बळ दिले. सुदैवाने मनोहरे यांची दोन्ही मुले हुशार निघालीत. मोठा मुलगा मनीषने दहावीत 84 टक्‍के व बारावीत 83 टक्‍के गुण मिळवून आयआयटीत प्रवेश मिळविला. तर धाकटा अमितही पुणे येथे आर्किटेक्‍ट करीत आहे.
दोन्ही मुलांची उज्ज्वल करिअरच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाही 59 वर्षीय मनोहरे घरी स्वस्थ बसले नाहीत. साठीतही त्यांनी तीनचाकीवर छोटेसे मोबाईल दुकान थाटून पानमसाला व चॉकलेक-बिस्किटे विकून कुटूंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. दर महिन्याला मिळणाऱ्या "स्टायपंड"च्या पैशातून काही रक्‍कम मनीष आपल्या आईवडिलांना पाठवितो. तरीही मुलांवर विसंबून न राहता त्यांनी आपला व्यवसाय भविष्यातही सुरूच ठेवण्याचा मनोदय बोलून दाखविला.
"माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही. तरीही त्यांनी आम्हाला काहीही कमी पडू दिले नाही. आम्ही शिकून खुप मोठे व्हावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळेच माझे आयआयटीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले.'
-मनीष मनोहरे (थोरला मुलगा)

 

Web Title: purshottam manohare success story