Maharashtra vidhansabha 2019 प्रा. कवाडे म्हणतात, ऍड. आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांना वंचित ठेवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

नागपूर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या रिपब्लिकन पक्षांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी तयार करताना वंचित ठेवले, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

नागपूर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या रिपब्लिकन पक्षांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी तयार करताना वंचित ठेवले, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची स्थापना करताना इतर पक्षांना आघाडीत स्थान दिले. परंतु, जे रिपब्लिकन पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर कार्य करीत आहेत, अशांना विचारणा केली नाही. त्यामुळे ऍड. प्रकाश आंबेडकरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवायचे आहे की नाही? असा प्रश्‍न पडत असल्याचे प्रा. कवाडे यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन जनशक्ती सेक्‍युलर आघाडी तयार केली आहे. यात रिपब्लिकन पक्षांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांचा समावेश आहे. त्यानुसार पीरिपाही राज्यातील सहा जागांवर विधानसभा निवडणूक लढविणार आहे. यात भंडारा, भुसावळ, नाशिक, घाटकोपर, कुर्ला, ठाणे, बडनेरा या जागांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. सेक्‍युलर मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सर्वसहमतीने हा निर्णय घेण्यात आला. भंडाऱ्यातून पीरिपाचे युवा नेते जगदीप कवाडे निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भीमसैनिकांचा राष्ट्रीय मेळावा
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या पूर्वसंध्येला 39 व्या भीमसैनिकांच्या राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन सात ऑक्‍टोबरला सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान आनंदनगर, सीताबर्डी येथे केले असल्याचे कवाडे यांनी सांगितले. मेळाव्यानंतर सायंकाळी साडेपाचला खुले अधिवेशन घेण्यात येणार असून, अधिवेशनाचे उद्‌घाटन आंध्र प्रदेशाचे माजी मंत्री गोलापल्ली सूर्याराव यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे, पॅथर नेते गंगाधर गाडे, सूर्यकांत गाडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील, असेही कवाडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pvt. Quade says, adv. Ambedkar deprived Republican parties