क्‍वारंटाइन मजूर झाले स्वयंपाकी...सरपण, अन्नधान्यही करतात गोळा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

केंद्र सरकारने बाहेर राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर हजारो मजूर तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. रविवारी सायंकाळी पोहोचलेल्या मजुरांना प्रशासनाकडून मदतकार्य न मिळाल्याने त्यांना जंगलात जाऊन सरपण आणावे लागले. त्यानंतर गावकऱ्यांकडून गोळा केलेल्या अन्नधान्यातून त्यांनी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली.

गडचिरोली : केंद्र सरकारने बाहेर राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर हजारो मजूर तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. मात्र, त्यांना क्‍वारंटाइन केलेल्या ठिकाणी स्थानिक पथकाकडून सहकार्य मिळत नसल्याने अन्न शिजविण्यासाठी मजुरांनाच स्वतः जंगलात जाऊन सरपण तसेच अन्नधान्यही गोळा करून पोटाची खळगी भरावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

येवली गावात रविवारी (ता. 3) तेलंगणा राज्यातून पाचशे मजूर येत असल्याची माहिती तेथील स्थानिक प्रशासनाला दिली होती. सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास मजुरांचा एक जत्था गावात पोहोचला. ग्रामस्थांनी त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाइन करून ठेवले. मात्र, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व नियंत्रणासाठी स्थानिक पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या पथकाचा एकही अधिकारी व कर्मचारी मजुरांची माहिती घेण्यासाठी दुपारपर्यंत पोहोचले नव्हते.

आरोपात काहीच तथ्य नाही

रविवारी सायंकाळी पोहोचलेल्या मजुरांवरही असाच प्रसंग ओढवला. प्रशासनाकडून मदतकार्य न मिळाल्याने या मजुरांना जंगलात जाऊन सरपण आणावे लागले. त्यानंतर गावकऱ्यांकडून गोळा केलेल्या अन्नधान्यातून त्यांनी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली. यासंदर्भात ग्रामसेवक अरुण धात्रक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सर्व मजुरांची व्यवस्था प्रशासनाने केली असून वरिष्ठांकडून आदेश मिळेपर्यंत मजुरांना गावात ठेवले जाईल. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोपात काहीच तथ्य नाही.

हेही वाचा : घरी परतण्यासाठी मजूर करताहेत जीवघेणी कसरत

अनेक अडचणींचा सामना

परराज्यातून आलेल्या लोकांमुळे कोरोचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने त्यांना 14 दिवस क्वारंटाइन करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे नियम आहेत. परंतु सध्या परराज्यातून येत असलेल्या मजूर स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेदखल होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात असून मजुरांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आदेशानंतरही मजुरांची पायपीट सुरूच

परराज्यातून आलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवून देण्याच्या सूचना शासनाने सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या. मात्र, यानंतरही जिल्ह्याच्या सीमा भागातून मजुरांची दररोज शेकडो किलोमीटरची पायपीट सुरू आहे. कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या आदेशानंतर काही भागात कार्यकर्त्यांनी वाहन उपलब्ध करून मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. मात्र, तेलंगणा राज्यातून येत असलेल्या हजारो मजुरांना प्रशासनाच्या मदतीची आवश्‍यकता आहे. क्‍वारंटाइन केलेल्या ठिकाणी जेवण तसेच निवासाची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine laborers turned to cooks