धावत्या रेल्वेत वाढले ‘डॉक्‍टर कॉल’

धावत्या रेल्वेत वाढले ‘डॉक्‍टर कॉल’

नागपूर - यंदा मॉन्सून चांगलाच लांबला आहे. जून अर्धा उलटूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पारा अजूनही ४० अंशांच्या घरात आहे. उकाड्याने सर्वच हैराण आहेत. वातावरणातील या बदलामुळे काही दिवसांमध्ये धावत्या रेल्वेतून येणाऱ्या डॉक्‍टर कॉलची संख्या वाढली आहे. एकट्या नागपूर स्थानकावर दररोज दहा ते पंधरा ‘डॉक्‍टर कॉल’ येत आहेत. प्रवाशांच्या आजारपणामुळे प्रशासनाचीही दमछाक होत आहे.

रेल्वेत शेकडो प्रवासी एकमेकांच्या संपर्कात येतात. परिणामी संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्‍यता वाढते. साधारणत: पाऊस पडल्यानंतर डॉक्‍टर कॉल वाढतात, असा रेल्वे प्रशासनाचा अनुभव आहे. यंदा मात्र पाऊस पडण्यापूर्वीच डॉक्‍टर कॉल वाढले आहेत. उष्माघाताचे रुग्ण अधिक असले, तरी गॅस्ट्रो, पोटदुखी, ताप, सर्दी, खोकला, मळमळ, डोकेदुखीमुळे अनेक प्रवासी बेजार असल्याचे चित्र आहे. त्यातच रेल्वे प्रवासादरम्यान सहजपणे डॉक्‍टर किंवा आवश्‍यक औषधी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची प्रकृती अधिकच गंभीर होते. अशा वेळी संबंधित प्रवाशाला रेल्वे प्रशासनाकडून वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाते.

डॉक्‍टर कॉल येताच संबंधित गाडी स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच रेल्वेच्या डॉक्‍टरांना पाचारण केले जाते. प्राथमिक तपासणीनंतर गरज असल्यास रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपले काम सांभाळून रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी दमछाक करावी लागत आहे.

रोज दहा ते पंधरा कॉल
एरवी दिवसभरात एखादाच डॉक्‍टर कॉल येतो. त्यात छातीत दुखत असल्याची तक्रार अधिक असते. मात्र, अलीकडे नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज सरासरी १० ते १५ डॉक्‍टर कॉल अटेंड करण्यात येत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे.

नागपूर स्थानकावर फार्मसीची गरज
नागपूर स्थानकावर चहूबाजूने दररोज सुमारे सव्वाशे गाड्या येतात. त्यातील बऱ्याच गाड्या लांब पल्ल्याच्या असून, दोन दिवसांच्या प्रवासानंतर इथवर पोहोचतात. प्रवासादरम्यान आजार बळावल्यास औषध उपलब्ध होत नाही. प्रवाशांची ही निकड लक्षात घेऊन नागपूर स्थानकावर फार्मसी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com