यंत्रयुगातही "रापी' हाच त्यांच्या जगण्याचा आधार 

केवल जीवनतारे 
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नागपूर - रणरणते उन्ह असो की, धोधो पडणारा पाऊस. चप्पल तुटली किंवा चपलेचा अंगठा तुटला की, नजर चप्पल शिवणारा कुठे बसला आहे याचा शोध घेते. तुटलेली चप्पल शिवण्यासाठी गटई कामगार लिहिलेले जेमतेम एक माणूस बसेल, असे शेड दिसते. यंत्रयुग आले परंतु गटई कामगारांचे जगण्याचे यंत्र असलेली "रापी' बदलली नाही. पहाटेचा सूर्य डोक्‍यावर आल्यापासून, तर सायंकाळच्या सूर्यास्तापर्यंत शेड किंवा वृक्षाच्या सावलीत बसून तुटलेल्या चपला आणि बुटपॉलिशसाठी ग्राहकांची प्रतीक्षा करणे हाच प्रवास त्यांच्या अंगवळणी पडलेला आहे. उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात दोन हजारांवर गटई कामगारांची नोंदणी आहे.

नागपूर - रणरणते उन्ह असो की, धोधो पडणारा पाऊस. चप्पल तुटली किंवा चपलेचा अंगठा तुटला की, नजर चप्पल शिवणारा कुठे बसला आहे याचा शोध घेते. तुटलेली चप्पल शिवण्यासाठी गटई कामगार लिहिलेले जेमतेम एक माणूस बसेल, असे शेड दिसते. यंत्रयुग आले परंतु गटई कामगारांचे जगण्याचे यंत्र असलेली "रापी' बदलली नाही. पहाटेचा सूर्य डोक्‍यावर आल्यापासून, तर सायंकाळच्या सूर्यास्तापर्यंत शेड किंवा वृक्षाच्या सावलीत बसून तुटलेल्या चपला आणि बुटपॉलिशसाठी ग्राहकांची प्रतीक्षा करणे हाच प्रवास त्यांच्या अंगवळणी पडलेला आहे. उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात दोन हजारांवर गटई कामगारांची नोंदणी आहे. मात्र, 20 वर्षांत अवघ्या 250 गटई कामगारांना "शेड' मिळाले आहे. उर्वरित वृक्षाच्या सावलीत छत्री खाली बसलेले दिसतात. 

जग वेगाने बदलू लागले आहे. आधुनिक जगात चंद्रावर माणूस पोहोचला. परंतु, हातावर पोट असणारे अजूनही लाचार अन्‌ गरिबीच्या जिण्यातून मुक्त होऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सारा समाज वीतभर पोटासाठी हातात "रापी' घेऊनच जगत आहे. परिस्थितीमुळे अनेक गटई कामगारांच्या मुलांच्या हाती लेखणी दिसत नाही. मुलगा जाणता झाला की, चपलेचा तुटलेला अंगठा शिवण्याचे प्रशिक्षण त्याला वडिलांकडूनच मिळते. दोरा घालून सुया कशा चालवायच्या हेच आयुष्य आहे का? हा सवाल चर्मकार समाजाच्या मुलांच्या मनात यावा यासाठी चर्मकार समाजातील तरुण मंडळी पुढे सरसावली आहे. 

"सकाळ'ने नागपूर येथे घेतलेल्या गोलमेज परिषदेतून हे चित्र दिसून आले आहे. चर्मकार समाजातील तरुणांना यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे, चपलांचा उद्योग उभारण्यासाठी योजना आहेत. परंतु, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. यामुळे चर्मकार समाज उद्योगपती होत नाही. चर्मकार समाजातील भावी पिढीचे आयुष्य बदलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश पाचपोर यांच्यासह अनेक तरुणांनी आता उन्हात बसलेल्या गटई कामगारांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यापासून, तर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी लढा उभारण्याचे ठरविले आहे. 

एका सर्वेक्षणानुसार 
75 हजारांवर चर्मकार समाज नागपूर शहरात 
22 डॉक्‍टर 
27 वकील 
1 निवृत्त न्यायाधीश 
260 शिक्षक 

आजही गटई कामगारांना त्यांच्या कामाचे योग्य मोल मिळत नाही. दहा-बारा तास एकाच ठिकाणी पाय मोडून बसून थकतो. रापी चालवताना ती सरकली की, बोट रक्तबंबाळ होते. याकडे कोणीही बघत नाही. गटई कामगारांचे जगणे आजही उपकार केल्यासारखेच. हे आयुष्य घालविण्यासाठी आणि भावी पिढी खुर्चीत बसावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. 
- योगेश पाचपोर,  सामाजिक कार्यकर्ते, चर्मकार समाज. 

Web Title: Raapi is the basis of his life