तिकीट कापल्याने "रावणाला'ही फटका

तिकीट कापल्याने "रावणाला'ही फटका

नागपूर : रावणदहन आणि विधानसभेच्या निवडणुकीचा संबंध काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडू शकतो. मात्र, रावणाची निर्मिती करणाऱ्या एका कलावंताला याचा फटका बसल्याने निश्‍चितच संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. यंदा आपल्याला उमेदवारी मिळणारच, या विश्‍वासाने अनेकांनी प्रचारासाठी रावणदहनाच्या कार्यक्रमाचे बेत आखले होते. मात्र, यापैकी अनेकांना डच्चू देण्यात आल्याने त्यांनी कार्यक्रमच रद्द केले आहेत. 
दसऱ्याच्या दिवशी रावणदहनाची परंपरा आहे. शहरासह विदर्भातील मोठ्या प्रमाणात रावणदहनाचे कार्यक्रमे घेतले जातात. रावण तयार करणारे काही मोजके कलावंत शहरात आहेत. यापैकी बिनवार नावाचे बंधू सुमारे 50 वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहेत. ते आत वृद्ध झाले आहेत. मात्र, पोटापाण्यासाठी नाईलाजाने त्यांनी व्यवसाय कायम ठेवला आहे. एका रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी सुमारे नव्वद हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यंदा निवडणूक असल्याने त्यांना 15 रावणाची प्रतिकृती तयार करण्याचे ऑर्डर मिळाली होती. अग्रीम म्हणून दहा हजार रुपयेसुद्धा देण्यात आले होते. शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या ऑर्डर देण्याऱ्यांपैकी काही इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे सहा जणांनी ऑर्डर रद्द केले. रावण तयार करण्यासाठी सर्व साहित्य आणले. महागड्या फटाक्‍यांची खरेदी केली. ऑर्डर रद्द झाल्यामुळे सर्व भुर्दंड बिनवार बंधूंवर बसला आहे. 
नोटाबंदीसह विविध कारणे 
काही वर्षांपर्यंत नागपूर, काटोल, चंद्रपूर, भंडारा, गोंदियासह मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील काही शहरांमधून रावणाची निर्मितीसाठी बिनवार यांना ऑर्डर दिली जायची. तेव्हा ही संख्या सुमारे 50 असायची. नोटाबंदी आणि वेगवेगळ्या नियमांमुळे ती आता दहा ते बारांवर येऊन ठेपली आहे. यंदा राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने ऑर्डर वाढले होते. 15 रावणाच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी चार ते पाच महिन्यांपासून आम्ही कामाला लागालो होते. सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असताना सहा ऑर्डर रद्द करण्यात आल्या. याचा आर्थिक फटका आम्हाला सहन करावा लागणार असल्याचे बिनवार यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com