स्थायी समितीसाठीही होणार रस्सीखेच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

नामनिर्देशितांमध्ये भाजपचे चार सदस्य
महापालिकेच्या पाच नामनिर्देशित सदस्यांची निवडही पक्षाच्या संख्याबळावर करण्यात येते. भाजपचे 108 नगरसेवक असल्याने नामनिर्देशित सदस्यांमध्ये भाजपकडून चार तर कॉंगेसकडून एकाची निवड होऊ शकणार आहे. या सदस्यांना अर्थसंकल्पात मतदान करण्याचा अधिकार नाही.

नागपूर : महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असून महापौर कोण होणार याबाबत नागपूरकरांत उत्सुकता असतानाच नव्याने निवडून आलेल्या सदस्यांत स्थायी समितीची चर्चा सुरू झाली आहे. स्थायी समितीत संख्याबळानुसार भाजपचे 12, कॉंग्रेसचे तीन तर बसपच्या एका सदस्याची वर्णी लागणार आहे. सोन्याची अंडी देणाऱ्या स्थायी समितीत कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे.

महानगरपालिका हद्दीत हुडकेश्‍वर, नरसाळा भाग सामील करण्यात आला. या भागाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महापालिकेची सदस्य संख्या 6 ने वाढवून 151 करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमतासह 108 जागा जिंकल्या. बसप वगळता सर्वांचे पानिपत झाले. निवडणुकीत भाजपला 108 जागा मिळाल्या. तर कॉंग्रेसला 29, बसपला 10, सेनेला 2, तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. त्यामुळे महापौरसह स्थायी समिती अध्यक्षही भाजपचाच असणार आहे. स्थायी समिती म्हणजे महापालिकेची तिजोरीच्या चाव्याच हाती असल्यासारखे असून अनेकजण कुठलेही पद नको; परंतु स्थायी समितीत संधी मिळावी, यासाठी जोर लावतात.

महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्याने आतापासून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवकांनी लॉबिंग सुरू केली आहे. काहींनी अध्यक्षपदाऐवजी सदस्यपदही मिळाले तरी भरपूर आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुढील पाच वर्षांत भाजपच्या संख्या बळानुसार स्थायी समितीत साठ जणांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपमध्ये अनेकजण प्रतीक्षा करण्याची शक्‍यता आहे. परंतु, कॉंग्रेसच्या तीन सदस्यांना एका वर्षासाठी स्थान मिळणार आहे. पाच वर्षांत केवळ 15 जणांना संधी मिळणार आहे. त्यामुळे या पक्षात प्रतीक्षा करण्यास कुणी तयार नसून पहिल्याच वर्षात वर्णी लागावी, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले आहे. बसपच्या एका सदस्याला संधी मिळणार आहे. यापूर्वी गटनेते असलेल्यानेच स्वतःचेच नाव पुढे केले होते. हा अनुभव बघता बसप स्थायी समितीत कुणाला संधी देते, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: race for chair in nagpur bjp