राफेलचा वाद आकलनापलीकडचा - पद्मविभूषण डॉ. अत्रे

रेशीमबाग - इंजिनिअर्स फोरमतर्फे मंगळवारी सुरेश भट सभागृहात आयोजित अभियंतादिन कार्यक्रमात पद्मविभूषण डॉ. व्ही. के. अत्रे यांना सन्मानित करताना फोरमचे कार्याध्यक्ष सुरेश गंधेवार; सोबत अध्यक्ष प्रकाश कुळकर्णी, व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे, केशव तायडे
रेशीमबाग - इंजिनिअर्स फोरमतर्फे मंगळवारी सुरेश भट सभागृहात आयोजित अभियंतादिन कार्यक्रमात पद्मविभूषण डॉ. व्ही. के. अत्रे यांना सन्मानित करताना फोरमचे कार्याध्यक्ष सुरेश गंधेवार; सोबत अध्यक्ष प्रकाश कुळकर्णी, व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे, केशव तायडे

नागपूर - राफेल उपयुक्त लढाऊ विमान आहे. त्यासंदर्भात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोण खरे आणि कोण खोटे बोलतो, हे आकलनापलीकडचे असल्याचे मत डीआरडीओचे माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. व्ही. के. अत्रे यांनी व्यक्त केले.

इंजिनिअर्स फोरमतर्फे मंगळवारी सुरेश भट सभागृहात आयोजित अभियंतादिनाच्या कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. संरक्षण साहित्य खरेदी-विक्रीचा करार नेहमीच गोपनीय असतो. केवळ खरेदी आणि विक्री करणाऱ्यालाच किमतीची कल्पना असते. ही माहिती कुणीही उघड करीत नाही. भारतात तयार झालेले हलक्‍या वजनाचे तेजस विमान नेव्हीने नाकारले आहे. हे विमानसुद्धा संरक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

डिझाइनमध्ये आवश्‍यक बदल करून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो, त्या दृष्टीने डीआरडीओ प्रयत्नशील आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र शत्रूंचा बीमोड करण्यात उपयुक्त आहे. सुखोई ३० विमानातून त्याचा मारा केला जाऊ शकतो. भारतात संरक्षण साहित्याशी संबंधित संशोधनावर फारच कमी खर्च केला जातो. देशाच्या एकूण दरडोई उत्पन्नाच्या केवळ ०.८ टक्केच खर्च होतो. हे क्षेत्र भक्कम करायचे असेल, तर संशोधन, तंत्रज्ञानाला चालना देणे आवश्‍यक असल्याचे सांगत संशोधनाच्या दृष्टीने दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. 

टॅलेंट आहे, संधी मिळत नाही
शालेय स्तरावर भारतीय शिक्षण दर्जेदार आहे. पण, पदवी अभ्यासक्रात भारतीय पद्धती फारच सुमार आहे. देशात टॅलेंट आहेच; पण योग्य संधी मिळत नसल्याने युवकांना विदेशात जावे लागते. संशोधन, तंत्रज्ञानावर भर देऊन मेक इन इंडियाप्रमाणेच डिझाइन, क्रिएट ॲड मॅनिफॅक्‍चर इन इंडियाला चालना मिळावी, अशी अपेक्षा डॉ. अत्रे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com