'डरो मत...!' राहुल गांधी यांनी दिली हिंमत - तानाजी वनवे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

नागपूर - महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर यांना हटवून आपली निवड कायदेशीर आणि नियमानुसार झाली आहे. विभागीय आयुक्तांनी याकरिता बहुमताचा आधार घेतला आहे. नेता बदलावा ही आपली एकट्याची नव्हे तर 17 नगरसेवकांची मागणी होती, असे नवनियुक्त गटनेते तानाजी वनवे यांनी "सकाळ' कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत सांगितले. राहुल गांधी यांनी डरो मत... असा सल्ला आम्हाला दिला होता. यातून सर्वांनी प्रेरणा घेतल्याचे सांगून वनवे यांनी अप्रत्यक्षपणे कुण्या एका नेत्याची दादागिरी नागपूरमध्ये यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे संकेतही दिले.

महापालिकेच्या निवडणुकीपासून शहरातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत. तो एकाच व्यक्तीमुळे सुरू असल्याने सर्व आमदार, नगरसेवक एकत्र आलेत. महापालिकेचा गटनेता निवडतानाही वाद उफाळून आला होता. मात्र नगरसेवकांचे कोणी ऐकले नाही. मुंबईवरून प्रतिनिधी पाठविले. सर्वांशी चर्चा केली. तेव्हासुद्धा ज्येष्ठ नगरसेवक म्हणून प्रफुल्ल गुडधे आणि आपले नाव आघाडीवर होते. दोघांपैकी कोणालाही नेता करावे, अशी मागणी बहुसंख्य नगरसेवकांनी प्रदेश निरीक्षकांकडे केली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ज्यांच्या नावाला सर्वांचा विरोध होता, त्याची निवड करण्यात आली. तरीही आम्ही शांत राहिलो.

पक्षाचा निर्णय म्हणून मान्य केला. त्यानंतर स्वीकृत सदस्य तसेच विषय समित्यांवर नियुक्‍त्या करताना नगरसेवकांना विश्‍वासात घेतले जाईल, असे वाटत होते. ते होत नसल्याने आम्ही थेट कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांना शहरात सुरू असलेल्या सर्व घडामोडींची माहिती दिली. त्यांनीसुद्धा "डरो मत, आगे बढो' असा सल्ला देऊन एकप्रकारे आम्हाला पाठिंबा दर्शवला होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी बहुमताने निर्णय घेतला जाईल, असे आम्हाला सांगितले. आज आमच्याकडे बहुमत आहे. ते आम्ही सिद्ध करून दाखविल्याचेही तानाजी वनवे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बंटी शेळके उपस्थित होते.

गुडधेंचे आभार
नेता बदलण्याच्या प्रक्रियेत ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे मोठे सहकार्य लाभले. त्यांनी स्वतःच गटनेत्याच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे आपली निवड होऊ शकली.

यांनी दिला पाठिंबा
प्रफुल्ल गुडधे, तानाजी वनवे, संदीप सहारे, जुल्फेकार भुट्टो, पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, रमेश पुणेकर, कमलेश चौधरी, नेहा निकोसे, परसराम मानवटकर, हर्षला साबले, प्रणिता शहाणे, मनोज गावंडे, आशा उईके, अंसारी सैय्यद बेगम मो. निजामुद्दीन, गार्गी प्रशांत चोपडा, दिनेश यादव यांची नावे होती. यापैकी रमेश पुणेकर वगळता अन्य नगरसेवकांची ओळख परेड 17 रोजी झाली.

Web Title: rahul gandhi support to tanaji vanave