मांडवलीतून झाला राहुलचा खून 

मांडवलीतून झाला राहुलचा खून 

नागपूर - नंदनवन हद्दीत जय जलाराम चौकात काल रात्री राहुल खुबाळकर याचा खून करणाऱ्या तीन आरोपींना नंदनवन पोलिसांनी अटक केली. 

विशाल विनायक गजभिये (21, श्रीरामनगर), शंटू गोपाल शील (21 मालचोपारा-प. बंगाल) आणि साहील ऊर्फ नुरी ऊर्फ शुभम दिलीप राईकवार (23, गजानन चौक, जुनी शुक्रवारी) अशी आरोपींची नावे आहेत. 

याप्रकरणी माहिती अशी, 14 जानेवारी रोजी राहुलचा भाऊ अमित हा त्याच्या दुचाकीने जात होता. त्याचवेळी शुभम नावाचा एक टाटा एस चालक आपले वाहन घेऊन जात होता. एका वळणावर दोघांचीही जोरदार धडक झाली. त्यात अमितच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अमित जखमी झाला होता. त्यावेळी आरोपी विशालने मध्यस्थी करून शुभमला घटनास्थळावरून पिटाळून लावले. त्यानंतर राहुल, त्याचा मोठा भाऊ राजेश आणि विशाल गजभिये यांनी अमितला दवाखान्यात भरती केले. त्यानंतर आरोपी विशालने टाटा एसचा चालक शुभम याच्याशी मांडवली केली. "अमितच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून त्याच्या उपचारावरदेखील खूप खर्च झाला आहे. त्यामुळे तू 45 हजार रुपये नुकसानभरपाई दे' असे शुभमला म्हटले. "एवढा खर्च कसा काय झाला' अशी शुभमने विशालला विचारणा केली. त्यानंतर शुभमने राहुलला फोन करून उपचारासाठी किती खर्च आला आणि विशाल 45 हजार रुपये मागत आहे, असे सांगितले. त्यामुळे विशाल हा शुभमसोबत मांडवली करीत असल्याचे राहुलच्या लक्षात आले. हजार, दोन हजार रुपये आपल्याला देऊन उर्वरित पैसे विशाल स्वत: ठेवणार आहे, असेही राहुलला कळले होते. 

त्यावरून काल रात्री 9 च्या सुमारास जय जलाराम चौकातील चामट लॉनजवळ सर्वजण भेटले. पैशावरून राहुल आणि विशाल यांच्यात वाद झाला असता राहुल आणि विशालच्या सहकाऱ्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात एक दगड विशालच्या पाठीवर लागला. त्यामुळे तो संतापला आणि त्याने चाकू काढून राहुलच्या पोटात खुपसला. राहुलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com