कांदा विक्री करणाऱ्या अडत्यांची झाडाझडती!

 01raid.jpg
01raid.jpg

अकोला : कांद्याच्या भडकणाऱ्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे साठेबाजीच्या संशयावरुन शनिवारी (ता. 7) जिल्हा पुरवठा विभागाने स्थानिक अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 11 अडत्यांच्या दुकानांची झाडाझडती घेतली. तपासणीदरम्यान काहीच आढळून न आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढत आहेत. बाजारात मुबलक कांदा उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बाजारात येणारा नवीन कांदा हा भिजलेल्या, कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यास दरदेखील मिळत नाही. 

अशा परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कांदा साठवणुकीची शक्‍यता आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. सदर निर्बंधाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व साठेबाजीर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पुरवठा विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 11 अडत्यांच्या दुकानांची तपासणी केली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.के. काळे, शहर पुरवठा अधिकारी प्रतीक्षा तेजणकर, पुरवठा निरीक्षक येन्नावार उपस्थित होते. 

दोन दिवसांत पुन्हा घटवली साठवणुकीची मर्यादा
राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 4 डिसेंबररोजी जिल्हा पुरवठा विभागाला कांदा साठवणूक निर्बंध लागू करण्याचा आदेश जारी केला होता. त्यानुसार कांद्याच्या साठवणुकीवर घाऊक व्यापाऱ्यांसाठी 500 क्विंटल (50 मेट्रीक टन) व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 100 क्विंटल (10 मेट्रीक टन) साठा निर्बंध निश्‍चित करण्यात आला होता. परंतु 6 डिसेंबर रोजी पुन्हा त्यात बदल करुन कांदा साठवणूक मर्यादा घाऊक व्यापाऱ्यांसाठी 250 क्विंटल (25 मेट्रीक टन) व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 50 क्विंटल (5 मेट्रीक टन) करण्यात आली. त्यामुळे दोन दिवसांतच शासनाने कांदा साठवणुकीची मर्यादा घटवल्याचे दिसून येते. 

22 व्यापारी ‘रडार’वर
जिल्ह्यात कांद्याची खरेदी- विक्री करणारे 22 परवानाधारक व्यापारी आहेत. सदर व्यापाऱ्यांची गोदामांची पुरवठा विभाग झाडाझडती घेणार आहे. याव्यतिरीक्त सातही तालुक्यांचे तहसीलदार, अन्न धान्य वितरण अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सुद्धा कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com