नॅरोगेज रेल्वेची कारला धडक

नॅरोगेज रेल्वेची कारला धडक
नागपूर : धडधडत जाणाऱ्या नॅरोगेज रेल्वेने कारला धडक दिली. यात कारचालक गंभीर जखमी झाला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी सायंकाळी भांडेवाडी-दिघोरी नॅरोगेज मार्गावरील बिडगाव, नागेश्‍वरनगरजवळील निर्मनुष्य रेल्वेक्रॉसिंग परिसरात हा अपघात घडला.
जखमी कारचालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्याचे नाव कळू शकले नसले तरी तो वाठोड्यातील स्वामीनारायण मंदिरजवळील रहिवासी असल्याचे कळते. प्राप्त माहितीनुसार प्रवाशांना घेऊन नॅरोगेज रेल्वे उमरेडच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी जखमी कारचालक कार घेऊन याच मार्गाने निघाला. रेल्वे येत असल्याची पुसटशी कल्पनाही त्याला आली नाही. बेदरकारपणे त्याने क्रॉसिंग ओलांडण्याचा प्रयत्न केला. कारला रेल्वेने बाजूने धडक दिली. यामुळे कार फरपटत जाऊन रेल्वे रुळाच्या कडेला असलेल्या खोलगट भागात जाऊन आदळली. यात कारचालक जखमी झाला. घटनेच्यावेळी अन्य प्रवासीसुद्धा कारमध्ये असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. घटनेनंतर चालकाने रेल्वेगाडी थांबवली. प्रवासी आणि नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर रेल्वे पुढच्या प्रवासाला रवाना झाली. रेल्वे सुरक्षा दलाने घटनेची दखल घेतली आहे. घटनेची चौकशी करून दोषीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे दपूमरेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com