रेल्वेच्या तिकिटामुळे खुनाचा लागला छडा

रेल्वेच्या तिकिटामुळे खुनाचा लागला छडा

नागपूर - रेल्वे तिकिटाच्या मदतीने धारगाव येथील हत्याकांडाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले. मृत युवकाची ओळख पटण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली. मृत युवक आणि आरोपी यांची कसलीही माहिती नसतानादेखील गुन्हे शाखेने आरोपींना जेरबंद केल्याने पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या पथकाला ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले. 

मृताच्या खिशात हावडा एक्‍स्प्रेसचे गोंदिया-नागपूर प्रवासाचे तिकीट होते. या प्रकरणी कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक या घटनेचा तपास करीत होते. आरपीएफच्या सीसीटीव्ही कॅमेरात युवक दिसला. तसेच गळ्यात पिवळ्या रंगाचा दुपट्टा आणि  त्या युवकाचे टक्कल पडले होते. त्याचा मागोवा घेत पोलिस आरोपीच्या शोधात निघाले. एका पेट्रोलपंपावरून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले, अशी माहिती गुन्हे शाखेचे नवनियुक्‍त पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीमध्ये गोपी ऊर्फ मोंटी ज्योतसिंग कछवाह (२२, गुलशननगर), प्रमोद जागेश्‍वर उरकुडे (२६, आदर्श सोसायटी, भरतवाडा), अविनाश रामदास निखारे (२९, नारायणपेठ, प्रेमनगर) आणि प्रकाश मधुकर पौनीकर (२७, लालगंज गुजरी) यांचा समावेश आहे. राजू नत्थू बम्बुरे (२०, लावेरी, किरणापूर, जि. बालाघाट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

मध्य प्रदेशात कमी किमतीत सोने मिळत असल्याची माहिती अविनाश आणि प्रकाश यांनी गोपी व प्रमोद यांना दिली होती. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ५ मार्च २०१९ रोजी चौघेही आरोपी राजू बम्बुरेच्या गावी गेले. राजूने बनावट सोन्याचा तुकडा देऊन गोपीकडून ३ हजार ७०० रुपये घेतले. गोपीला फसवणूक झाल्याचे कळले. गोपी आणि प्रमोद यांनी राजूला धडा शिकविण्याचे ठरविले. गोपीने राजूसोबत संपर्क साधून आणखी सोने खरेदी करायचे आहे, असे सांगितले. ‘अधिकची बोलणी करण्यासाठी तू नागपूरला ये’ असेही म्हटले. ७ मार्चला राजू नागपूरला आला. त्या वेळी गोपी आणि प्रमोद हे रेल्वेस्थानकावर हजर होते. गोपी आणि प्रमोद यांनी राजूला दुचाकीवर बसवून धारगाव शिवारातील गणपती पाटील यांच्या शेतात नेले. दोघांनीही तीक्ष्ण शस्त्राने राजूच्या गळा चिरून खून केला.

सीसीटीव्ही फुटेज आले कामी
पोलिसांनी संत्रा मार्केट ते धारगाव शिवारापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी केली. त्यात राजू हा आरोपींसोबत दुचाकीने जाताना दिसून आला होता. एका आरोपीचे छायाचित्र पोलिसांच्या हाती आल्याने पोलिसांनी पिवळा दुपट्टा आणि टक्‍कल असलेल्या युवकाचा शोध सुरू केला. त्यानुसार पोलिसांची विविध पथके त्याच्या शोधात होती.  पोलिसांनी टक्कल असलेल्या २० ते २५ युवकांना आणून त्यांची चौकशी केली. 

आरोपी सापडला 
रविवारी दुपारी एपीआय ज्ञानेश्‍वर भेदोडकर, योगेश चौधरी यांना राणी दुर्गावती चौकातील एका पेट्रोलपंपावर आरोपी दिसून आला. त्याच्या गळ्यात पिवळा दुपट्टा होता आणि डोक्‍यावर केस नव्हते. पोलिसांना त्या युवकावर दाट संशय आल्याने त्याला पकडले. त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव प्रकाश पौनीकर असे सांगितले. प्रकाशची चौकशी केली असता त्याने गोपी व प्रमोदचे नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्यांनाही उचलले. आरोपींनी खुनाची कबुली दिली, असेही भरणे यांनी पत्रकारांना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com