तीन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; शेतकरी सुखावला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मूग, उडीद व सोयाबीन ही पिके ऐन फुलावस्थेत तर मका कणीस फेकण्याच्या अवस्थेत असतांना पाऊस गायब झाल्याने या पिकांचे उत्पन्न हातचे वाया गेले आहे.

नांदुरा - नांदुरा तालुक्यात तीन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असला तरी ही पावसाची दडी खरीप पिकाच्या उत्पन्नवाढीवर वरवंटा फिरवून गेली आहे. मूग, उडीद व सोयाबीन ही पिके ऐन फुलावस्थेत तर मका कणीस फेकण्याच्या अवस्थेत असतांना पाऊस गायब झाल्याने या पिकांचे उत्पन्न हातचे वाया गेले आहे.

मागील वर्षी कॉटनबेल्टची किनार लाभलेल्या या परिसरात गुलाबी बोंडअळीने धुमाकूळ केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सोयाबीन, मका, उडीद व मूग पिकाकडे वळवला असतांनाच पावसाने उघडीप दिल्याने यावर्षी पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या आशा धुळीस मिळाल्या आहे. सध्या दि. 16 चे सकाळी 7 वाजल्यापासून तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. खरीप पीक तर हातचे गेले असून रब्बीच्या पिकांना तरी याचा फायदा व्हावा. यासाठी जास्त पावसाच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहे.

तालुक्यात दि. 16 ला सकाळपासून बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. हाच पाऊस 8 ते 10 दिवसापूर्वी पडला असता तर अनेक खरिपाची पिके हातची गेली नसती. सध्या सोयाबीन, उडीद व मूग तसेच मका पिके उत्पन्नवाढीतून बाद झाली आहेत. 'देर आया दुरुस्त आया' उक्तीप्रमाणे रब्बीच्या पिकाला तरी फायदा व्हावा असा पाऊस होणे अपेक्षित आहे. - विशाल भाकरे, शेतकरी, कंडारी

Web Title: The rain is back in state after three weeks