शहरात पावसाची जोरदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

नागपूर : मॉन्सूनने देशभरातून निरोप घेतला असतानाच शुक्रवारी अचानक शहरात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सायंकाळच्या सुमारास बरसलेल्या पावसाने नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. नागपूर वेधशाळेने शनिवारीही विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे. 

भारतीय हवामान विभागाने मॉन्सून माघारी परतल्याची नुकतीच घोषणा केली. त्यामुळे आता पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला, असे अनेकांना वाटू लागले होते. मात्र, शुक्रवारी अचानक वातावरण बदलले. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी चारनंतर काळे ढग दाटून आले आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. रामदासपेठ, सीताबर्डी, धंतोली, सिव्हिल लाइन्ससह शहरातील अनेक भागांत पाऊस अर्धा ते तासभर दणादण बरसला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेकांना आडोसा शोधावा लागला. रेनकोट व छत्र्यादेखील बाहेर पडल्या. 
आजही इशारा 
पावसाचा फटका विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांनादेखील बसला. प्रचार सध्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे सर्वच उमेदवार प्रचाराला जोमाने भिडले आहेत. परंतु, पावसाने त्यांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले. काही सभा रद्द झाल्या, तर काही पाऊस थांबल्यानंतर झाल्या. विदर्भात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. हवामान विभागाने शनिवारीही नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in the city