शहरात मुसळधार पण अल्पकाळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नागपूर : दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या उपराजधानीला शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जवळपास अर्धा तास बरसलेल्या धो-धो पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली व खोलगट भागांतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अग्निशमन विभागाचीही दमछाक झाली. विदर्भात पावसाचा जोर आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात दोन-तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. तो अंदाज आज तंतोतंत खरा ठरला.

नागपूर : दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या उपराजधानीला शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जवळपास अर्धा तास बरसलेल्या धो-धो पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली व खोलगट भागांतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अग्निशमन विभागाचीही दमछाक झाली. विदर्भात पावसाचा जोर आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात दोन-तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. तो अंदाज आज तंतोतंत खरा ठरला. दिवसभर ऊन तापल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास वरुणराजा शहरात सर्वत्र धो-धो बरसला. रामदासपेठ, सीताबर्डी, सिव्हिल लाइन्स, गोकुळपेठ, रविनगर, खामला, वर्धा रोड, प्रतापनगर, सदर, कामठी रोड, मेडिकल चौक, नंदनवन, महाल, सक्‍करदरा, मानेवाडा, बेसा, हिंगणा, इसासनीसह अनेक भागांमध्ये कानठळ्या बसविणाऱ्या विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. जवळपास अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. नदी-नालेही ओसंडून वाहिले. शहरात काही भागांमध्ये विद्‌युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले.
अग्निशमन विभागाची दमछाक
पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडल्याने व पाणी घुसल्याने अग्निशमन विभागाची दमछाक झाली. रामदासपेठ, भेंडे ले-आउट, नंदनवन परिसरातील एस. डी. हॉस्पिटल, त्रिमूर्तीनगरातील नागोबा मंदिर, कार्पोरेशन कॉलनी आदी ठिकाणी झाडे पडल्याने काही ठिकाणी वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. हवामान विभागाने रात्री साडेआठपर्यंत शहरात 14.2 मिलिमीटर पावसाची नोंद केली. गेल्या 30 जूननंतर शहरात झालेला हा सर्वाधिक पाऊस होय. त्यावेळी दोन तासांत तब्बल 75.4 मिलिमीटर पाऊस बरसला होता. हवामान विभागाने शनिवारी व रविवारीही विदर्भात जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in nagpur city