चिंब पावसानं...आबादानी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

नागपूर  : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मुक्‍कामी असलेल्या वरुणराजाने मंगळवारी शहरात पुन्हा दमदार हजेरी लावली. दिवसभर कोसळलेल्या संततधार पावसाने शहर अक्षरश: पाणी पाणी झाले. पावसामुळे नागपूरकर तर सुखावलेच, शिवाय बळीराजाच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. शहरात रात्री साडेआठपर्यंतच्या बारा तासांत 70 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाने आणखी चोवीस तासांचा इशारा दिल्याने बुधवारीही विदर्भात जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

उपराजधानीत पहाटेपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत "नॉन स्टॉप' बरसला. वरुणराजाने कधी रिमझिम तर कधी जोरदार "बॅटिंग' केली. दिवसभरातील पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह चौकांना तलावाचे स्वरूप आले. खोलगट भागांमध्येही कुठे गुडघाभर, तर कुठे मांडीभर पाणी साचले. नदी-नालेही दुथडी भरून वाहिले. पावसामुळे दैनंदिन जनजीवनसुद्धा विस्कळीत झाले. शिवाय गारठा वाढल्याने पाराही 25 अंशांपर्यंत घसरला. हवामान विभागाने शहरात सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत 70 मिलिमीटर पावसाची नोंद केली.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. चंद्रपूर (132.9 मिलिमीटर), गडचिरोली (111.8 मिलिमीटर) आणि ब्रह्मपुरी (100.8 मिलिमीटर) या ठिकाणी मुसळधार कोसळला. तर यवतमाळ (37.2 मिलिमीटर), अमरावती (23.8 मिलिमीटर), वाशीम (23 मिलिमीटर), वर्धा (17.6 मिलिमीटर) येथेही समाधानकारक पाऊस झाला. विदर्भात सर्वाधिक 270 मिलिमीटर पावसाची नोंद गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain news nagpur