बॉम्बच्या धमकीनंतर रेल्वेस्थानकावर हायअलर्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

संयुक्त "सर्च ऑपरेशन' राबविण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने श्‍वानाच्या मदतीने फलाटावर बारकाईने तपास सुरू केला.

नागपूर : माथेफिरूने शुक्रवारी पहाटे नागपूर रेल्वेस्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मवर बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. या प्रकाराने शहर पोलिस दलासह रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. पहाटे अडीच वाजता हायअलर्ट घोषित करून प्रत्येक कानाकोपऱ्याची बारकाईने तपासणी करण्यात आली. कुठेही स्फोटके न आढळल्याने सुरक्षा यंत्रणांचा जीव भांड्यात पडला. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाचा निकाल येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हायअलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
गत आठवड्यातच माथेफिरूने विमानतळाच्या काउंटरवर निनावी फोन करून मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याची घोषणा केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच माथेफिरूने शुक्रवारी पहाटे 2.25 वाजताच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वर बॉम्ब ठेवला असल्याची बतावणी त्याने केली होती. गांभीर्य लक्षात घेत लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाला माहिती देण्यात आली. सोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीताबर्डी, गणेशपेठ, सोनेगाव पोलिस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक, एटीएसला माहिती देत कारवाईचे आदेश दिले. तत्काळ संयुक्त "सर्च ऑपरेशन' राबविण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने श्‍वानाच्या मदतीने फलाटावर बारकाईने तपास सुरू केला. फलाट आठसह लगतच्या भागातही तसेच रेल्वेस्थानकावरील संवेदनशील भागांमध्ये तपासणी करण्यात आली. कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळून न आल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.
लवकरच सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या प्रकरणाचा निकाल घोषित होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर देशभरात खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. त्यातच बॉम्बची धमकी मिळाल्याने रेल्वेस्थानकावरही हायअलर्ट कायम ठेवण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दोन्ही भागांतील प्रवेशद्वारावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय रेल्वेस्थानकावरील गस्त वाढविण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. संशयितांवरही पाळत ठेवली जात आहे. श्‍वान पथकाच्या मदतीने सातत्याने परिसराची तपासणी करून घेण्यात येत आहे. रॅण्डम स्वरूपात रेल्वेगाड्यांमध्येही तपासणी केली जात आहे.

आरोपी अटकेत
गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांना फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक पद्धतीने शोध घेत पोलिसांनी ईश्‍वर सावलकर (22, रा. उज्ज्वलनगर, वर्धा रोड) या आरोपीला हुडकून काढले. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हापासून तो नैराश्‍यात असून सतत दारूच्या नशेत असतो. त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याचे तपासात पुढे आले. शासकीय यंत्रणा व प्रवाशांना त्रास दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करीत आरोपीला सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain station after the bomb threat