स्मार्ट सिटीचा प्रवास दुष्काळाकडे!

राजेश प्रायकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

स्मार्ट सिटीचा प्रवास दुष्काळाकडे!
नागपूर : नुकताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरात 50 टक्के पाणी कपातीचे संकेत दिले. त्यातच सध्या शहराच्या विहिरींचेही पाणी खोल गेले. महापालिकेकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे गेल्या काही वर्षांत वाढलेल्या जलसंकटाने अधोरेखित केले. राज्यशासनाने नऊ वर्षांपूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अंमलबजावणीबाबत दिलेले निर्देश महापालिकेने धाब्यावर बसविल्याने स्मार्ट सिटीचा प्रवास वाळवंटाकडे सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

स्मार्ट सिटीचा प्रवास दुष्काळाकडे!
नागपूर : नुकताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरात 50 टक्के पाणी कपातीचे संकेत दिले. त्यातच सध्या शहराच्या विहिरींचेही पाणी खोल गेले. महापालिकेकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे गेल्या काही वर्षांत वाढलेल्या जलसंकटाने अधोरेखित केले. राज्यशासनाने नऊ वर्षांपूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अंमलबजावणीबाबत दिलेले निर्देश महापालिकेने धाब्यावर बसविल्याने स्मार्ट सिटीचा प्रवास वाळवंटाकडे सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षीचे पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील घट भविष्यातील पाणीटंचाईचे संकेत देत आहे. त्यातच मध्य प्रदेशने चौराई धरणातून पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. भरीस भर आधी शहरात मुरणारे पावसाचे पाणी सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी वाहून जात आहे. पावसाचे पाणी जिरवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याची गरज असून यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आवश्‍यक झाले आहे. पाणीटंचाईचे संकट बघता राज्यशासनाने 6 जून 2007 मध्ये राज्यशासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबत अधिसूचना काढली. परंतु, याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. या अधिसूचनेची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्याने राज्यशासनाने पुन्हा 15 जून 2016 रोजी अधिसूचना काढली अन्‌ महापालिकांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. परंतु महापालिकेने राज्यशासनाचे निर्देशच धुडकावले. रेन वॉटर हार्वेस्टिंग घराघरांत करावे, यासाठी महापालिकेने कुठलीही जनजागृती केली नाही. नव्या घराच्या बांधकामाचे नकाश मंजूर करताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करण्यास बंधनकारक असल्याचे नगर रचना विभागाचे अधिकारी संबंधित घरमालकास सांगतात. मात्र, याबाबत तपासणीची यंत्रणा नसल्याने नागरिकही दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेची उदासीनता आणि नागरिकांच्या अनभिज्ञतेमुळे भविष्यात नागपूरचे वाळवंट होण्याची शक्‍यता बळावली आहे.
केवळ शंभरावर घरांत रेन वॉटर हार्वेस्टिंग
नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास मालमत्ता करातील सामान्य करात पाच टक्के सूट देण्याची योजना महापालिकेने सुरू केली आहे. मात्र, जनजागृतीअभावी नागरिकांपर्यंत अद्याप ही योजना पोहोचली नाही. सहा लाख मालमत्ता असून केवळ शंभरावर लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले.
लोकप्रतिनिधींकडेही अभाव
नागरिकही लोकप्रतिनिधींचे अनुकरण करतात. मात्र, महापालिकेत दीडशेवर नगरसेवक असून केवळ मोजक्‍याच नगरसेवकांकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा आहे. मनपाच्या अनेक झोन कार्यालयातही रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अभाव असल्याने पावसाचे पाणी नाल्यात वाहून जात आहे.

Web Title: rain water harvesting news