अतिवृष्टी, अवेळी पावसाने झाले नुकसान, शेतकऱ्यांच्या दिवाळीवर पावसाचे विरजन 

अतिवृष्टी, अवेळी पावसाने झाले नुकसान, शेतकऱ्यांच्या दिवाळीवर पावसाचे विरजन 

नागपूर : वरुणराजाच्या मेहरबानीवर पीक घेणारा बळीराजा यंदा त्याच्या लहरीपणामुळे आगतिक झाला आहे. जिल्ह्यातीळ सर्वच तालुक्‍यातील शेतकऱ्यांची अवस्था आर्त करणारी आहे. मागील वर्षीचा दुष्काळानंतर यावर्षीची दिवाळी चांगली होईल या आशेने राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिवाळीवर पावसाचे विरजन पडल्याचे चित्र आहे. 
गत वर्षी कळमेश्‍वर, काटोल व नरखेड या तीन तालुक्‍यात व मौदा वगळता सर्वच तालुक्‍यातील काही मंडळात दुष्काळ पडला होता. दुष्काळाची भरपाई काही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही हे देखील तेवढेच खरे. जिल्ह्यात मुख्यत: कपाशी, सोयाबीन, संत्रा, तूर, धान ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदा उशीराने सुरू झालेला पाऊस जिल्ह्यात चांगलाच रमला. दिवाळीच्या आदल्या दिवशीही पावसाने लावलेली हजेरी शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी ठरली आहे. 
अति पावसामुळे उमरेड उपविभागातील सर्व तिन्ही तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे. या भागात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. याशिवाय कपाशीची वाढ खुंटली आहे. तुरीचेही नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यामुळे शेतकरी पुरता बेजार झाला असून त्याला हे दु:ख कुणालाच सांगता येत नाही. 
दिवाळीपूर्वी निवडणुका लागल्याने बाजारसमित्याही शासकीय खरेदीला सुरूवात झाली नाही. कापूसही घरी आला नाही. पीककर्जासाठी बेजार झाल्यावर जसेतसे पैसे काढून मशागत केल्यावर दिवाळीपूर्वी हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण नसल्याचे चित्र आहे. 

सोयाबीन पावसात गेले 
यंदा पावासाने जरी उशीरा हजेरी लावली असली तरी तो सुरुवातीला समाधान कराक असल्याने शेतकऱ्यांना पिकांपासून मोठी आशा होती. मात्र शेवटीपर्यंत पाउस दमदार बरसल्याने सोयाबीनला मोठा फटका बसला. बहुतांश शेतकरी दिवाळीपूर्वी हाती पैसा यावा यासाठी सोयाबीनचे नियोजन करतात यावेळी मात्र, पावासाने सोयाबीनचे नियोजन बिघडविले. 
 
कपाशी जेमतेम पात्यावर 
पावसाचा फटका बसल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे. यामुळे चांगले वाढणारे वाणही मागे पडले. दिवाळीत साधारणत: पहिल्या फेरीचा कापूस घरी आलेला असतो. मात्र यावेळी कपाशी जेमतेम पात्यावर आहे. दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांनी यावेळी कपाशीला प्राधाण्य दिले. तेथेही कपाशीची अशीच अवस्था आहे. कापूस घरी येण्यास आणखी महिनाभर असल्याचे शेतकरी सांगू लागले आहेत. 

बाजारपेठा पडल्या ओस 
शासनाकडून अद्याप बाजार समित्यांमध्ये शासकीय शेतमाल खरेदीला सुरुवात झाली नाही. व्यापाऱ्यांकडून खरेदी सुरु झाली असली तरी शेतकऱ्यांकडे असणारा माल दर्जेदार नसल्याचे कारण सांगून व्यापारी हमीभाव देत नसल्याचे चित्र आहे. नवरात्रीचा मुर्हुत साधून व्यापारी कापसाच्या खरेदीला सुरुवात करतात. मात्र, यंदा तेही झाले नाही. यामुळे बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com